Join us  

AUS vs IRE: ऑस्ट्रेलियाचा आयर्लंडवर 42 धावांनी मोठा विजय; गुणतालिकेत झाली मोठी उलटफेर!

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 5:05 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आज या स्पर्धेत यजमान ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांच्यात सामना पार पडला. यजमान संघाने नवख्या आयर्लंडचा दारूण पराभव करून स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला. 42 धावांनी मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाच्या नेट रनरेट वाढला आहे. कांगारूच्या घातक गोलंदाजीसमोर आयर्लंडच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. अखेर आयर्लंडचा संघ 20 षटके देखील खेळू शकला नाही आणि    18.1 षटकांत 137 धावांवर सर्वबाद झाला. 

तत्पुर्वी, आयर्लंडने नाणेफेक जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कांगारूचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या षटकांत अवघ्या 3 धावा करून स्वस्तात माघारी परतला. मग संघाची धुरा कर्णधार आरोन फिंचने सांभाळली. त्याला मिचेल मार्शने देखील साथ दिली परंतु मार्श नवव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 28 धावांवर बाद झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने आपल्या कर्णधाराची साथ देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही अपयश आले आणि तो 13 धावा करून तंबूत परतला. आरोन फिंचने 44 चेंडूत शानदार 63 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र फिंच 17व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर बाद झाला. अखेरच्या काही षटकांमध्ये मार्कस स्टॉयनिसने 35 धावांची साजेशी खेळी केली. त्यामुळे कांगारूच्या संघाने 20 षटकांत 5 बाद 179 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची सांघिक खेळी आयर्लंडकडून बॅरी मॅककार्थीने सर्वाधिक 3 बळी पटकावले, तर जोशुआ लिटलला 2 बळी घेण्यात यश आले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 180 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडच्या फलंदाजांना घाम फुटला. आयर्लंडकडून एकट्या लॉर्कन टकरने किल्ला लढवला मात्र त्यालाही अपयश आले. टकरने 48 चेंडूत 71 धावांची ताबडतोब खेळी केली मात्र त्याला इतर कोणत्याच फलंदाजाची साथ मिळाली नाही. टकर व्यतिरिक्त आयर्लंडच्या कोणत्याच फलंदाजाला 20चा आकडा गाठता आला नाही. अखेर आयर्लंडचा संघ 20 षटकेही खेळू शकला नाही आणि 18.1 षटकांत सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क आणि डम झाम्पा यांनी प्रत्येकी 2-2 बळी पटकावले. तर मार्कस स्टॉयनिसला एक बळी घेण्यात यश आले. कांगारूच्या गोलंदाजांनी केलेल्या सांघिक कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीकडे कूच केली आहे. 

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये चुरस या विजयासह यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघाने ग्रुप एच्या क्रमवारीत दुसरे स्थान गाठले आहेत. कांगारूच्या संघाचे सध्या 5 गुण आहेत. मात्र न्यूझीलंडचा नेट रनरेट जास्त असल्यामुळे न्यूझीलंड टॉपवर आहे. ग्रुप ए मधून न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरी गाठणार हे जवळपास निश्चित आहे, त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीसाठी चुरस होणार आहे. इंग्लिश संघ सध्या 3 गुणांसह ऑस्ट्रेलियाच्या पाठोपाठ तिसऱ्या स्थानावर आहे. 

आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - आरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवुड, डम झाम्पा. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२आॅस्ट्रेलियाआयर्लंडआयसीसीइंग्लंडअ‍ॅरॉन फिंच
Open in App