Join us

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी ऑस्ट्रेलियाला तगडा धक्का, स्टार खेळाडूची माघार, IPL खेळणार की नाही?

Setback for Australia, Champions Trophy : अनुभवी ऑलराऊंडर स्पर्धेतून बाहेर, IPL मध्ये कोणत्या संघाला बसणार फटका... वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:38 IST

Open in App

Setback for Australia, Champions Trophy : भारतात रणजी ट्रॉफीची धूम सुरु आहे. टीम इंडियाचे सर्व बडे खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहेत. त्यानंतर भारत-इंग्लंड वनडे मालिका होणार आहे. आणि १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. यंदा या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण भारत आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. या स्पर्धेआधी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार ऑलराऊंडर मिचेल मार्श (Mitchell Marsh) दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तसेच त्याच्या IPL 2025 मधील समावेशावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मिचेल मार्श पाठीच्या दुखापतीशी झुंजत आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला स्पर्धेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात मिचेल मार्शचा समावेश केला होता. पण दुखापतीमुळे मार्शला बाहेर राहावे लागणार आहे. दुखापतींमुळे त्याच्या कारकिर्दीवर यापूर्वी अनेकदा परिणाम झाला आहे. सोशल मीडियावर माहिती देताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने लिहिले की, मिचेल मार्श पाठीच्या समस्येमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी ऑस्ट्रेलिया कोणत्या खेळाडूला संघात स्थान देते हे पाहावे लागणार आहे.

IPL 2025 मधील समावेशाचे काय?

चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर आयपीएल सुरु होणार आहे. या स्पर्धेतही मिचेल मार्श खेळणार की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. IPL 2025 ही स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यानंतर दोन आठवड्यांत सुरू होणार आहे. मार्शला लखनौ सुपर जायंट्सने ३.४० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्यामुळे मार्श त्या वेळेपर्यंत तंदुरूस्त होणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

अलीकडेच मिचेल मार्श बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताविरुद्ध खेळताना दिसला. मात्र तेथे तो फ्लॉप झाला. त्याने पाच पैकी पहिले चार सामने खेळले. त्यादरम्यान त्याच्या बॅटमधून ७३ धावाच आल्या. तो गोलंदाजीतही छाप पाडू शकला नाही. सलग फ्लॉप कामगिरीनंतर मार्शला पाचव्या कसोटी सामन्यात स्थान देण्यात आले नाही.

टॅग्स :आॅस्ट्रेलियाचॅम्पियन्स ट्रॉफीइंडियन प्रिमियर लीग २०२५