Join us

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीतही श्रीलंकेला लोळवले, 366 धावांनी दणदणीत विजय

ऑस्ट्रेलियन संघाने दमदार कमबॅक केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 09:34 IST

Open in App

कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका : भारताकडून मानहानिकारक पराभवानंतर विजयपथावर परतण्यासाठी दबावाचे प्रचंड ओझे पाठीवर घेऊन फिरणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने दमदार कमबॅक केले. ऑस्ट्रेलियाने सोमवारी दुसऱ्या कसोटीतही श्रीलंकेला लोळवले. कॅनबेरा येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत यजमानांनी 366 धावांनी विजय मिळवत मालिका 2-0 अशी खिशात घातली. मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्याचा सामना करण्यात श्रीलंकेचे फलंदाज अपयशी ठरले. स्टार्कने दुसऱ्या डावात 46 धावांत 5 विकेट घेत सामन्यात दहा विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्याने पहिल्या डावात 56 धावांवर 5 विकेट घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 5 बाद 534 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 215 धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पाहुण्यांना फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात 3 बाद 196 धावांची भर घातली आणि श्रीलंकेसमोर विजयासाठी 516 धावांचे लक्ष्य ठेवले. 

या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचे आघाडीचे फलंदाज पुन्हा अपयशी ठरले. कुसल मेंडिस व चमिका करुणारत्ने यांनी 46 धावांची भागीदारी करताना संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु लँम्बूश्चँग्नेने मेंडिसला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर श्रीलंकेचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. श्रीलंकेला दुसऱ्या डावात 149 धावाच करता आल्या.  

टॅग्स :आॅस्ट्रेलियाश्रीलंका