चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत धडक मारणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. स्फोटक सलामीवीर मॅथ्यू शॉर्टला अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली आहे. त्याच्या दुखापतीमुळे सेमीच्या लढतीत ऑस्ट्रेलियन संघाला सलामी जोडी बदलण्याची वेळ येऊ शकते. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात शॉर्ट हा ट्रॅविस हेडसोबत बॅटिंग करताना दिसला. पण धावा काढताना त्याला संघर्ष करावे लागत होते. त्यामुळे त्याने बाउंड्रीच्या माध्यमातून धावा जमवण्याचा डाव खेळला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कॅप्टन स्टीव्ह स्मिथनं व्यक्त केली चिंता
अफगानिस्तान विरुद्धच्या सामन्यात मॅथ्यू शॉर्टनं १५ चेंडूत २० धावांची उपयुक्त खेळी करताना पहिल्या ४.३ षटकात ट्रॅविस हेडसोबत ४४ धावांची दमदार भागीदारी रचली होती. मॅच रद्द झाल्यावर ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्टीव्ह स्मिथ याने शॉर्टच्या दुखापतीबद्दल चिंता व्यक्त केली. त्याला हालचाल करणंही अवघड झाले असून तो कमी वेळात रिकव्हर होण्याची शक्यता कमी वाटते, असे स्मिथनं म्हटले आहे. ऑस्ट्रेलियन संघाला सेमीत नवा डाव खेळावा लागणार आहे, याचे संकेतच ऑस्ट्रेलियन कॅप्टनने दिले आहेत.
IPL स्टार जेक फ्रेझर-मॅकगर्कला मिळू शकते संधी मिचेल मार्शच्या दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियन संघानं जेक फ्रेझर-मॅकगर्क या युवा खेळाडूला आपल्या ताफ्यात सामील केले होते. तो या ताफ्यातील अतिरिक्त फलंदाज आहे. आयपीएलमध्ये छाप सोडणाऱ्या या युवा खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही धमक दाखवली आहे. आता मोठ्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया या छोट्या पॅकवर डाव खेळणार का? ते पाहण्याजोगे असेल. त्याच्याशिवाय ऑलराउंडर ॲरन हार्डीच्या रुपातही ऑस्ट्रेलियाकडे एक पर्याय आहे.
राखीव खेळाडूच्या रुपात असलेल्या कूपर कोनोलीचा विचार होणार?
जर मॅथ्यू शॉर्ट उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला तर ऑस्ट्रेलियन संघ ट्रॅव्हलिंग रिझर्व असलेल्या डावखुरा फलंदाज आणि फिरकीपटू कूपर कॉनोली यालाही संघात समावेश करून घेऊ शकते. फिरकीपटूचा अतिरिक्त पर्याय म्हणून ऑस्ट्रेलिया संघ या खेळाडूचा विचार करणार का? ते देखील पाहण्याजोगे असेल.