Join us  

ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेला लोळवलं, ट्वेंटी-20 नोंदवला सर्वात मोठा विजय

डेव्हीड वॉर्नरने ऑस्ट्रेलियाच्या ट्वेंटी-20 संघात पुनरागमन करताना अखेरच्या चेंडूवर शतक पूर्ण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 12:40 PM

Open in App

डेव्हीड वॉर्नरने ऑस्ट्रेलियाच्या ट्वेंटी-20 संघात पुनरागमन करताना अखेरच्या चेंडूवर शतक पूर्ण केले. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 2 बाद 233 धावा चोपल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेला 20 षटकांत 9 बाद 99 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाने हा सामना 134 धावांनी जिंकला. ऑसींचा ट्वेंटी-20 क्रिकेटमधील ( धावांच्या बाबतीत) सर्वात मोठा विजय ठरला, तर श्रीलंकेचा सर्वात मोठा पराभव ठरला. 

श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यात वॉर्नरने तुफान फटकेबाजी केली. त्याला कर्णधार अॅरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांचीही तोडीसतोड साथ मिळाली. वॉर्नरचे ट्वेंटी-20 क्रिकेटमधील पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक ठरले. या सामन्यात स्टीव्ह स्मिथनेही ऑसींच्या ट्वेंटी-20 संघात पुनरागमन केले, परंतु त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. वॉर्नरचा आज 33वा वाढदिवस आहे आणि आजच्याच दिवशी त्यानं खणखणीत शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला 2 बाद 233 धावांची मजल मारून दिली. वॉर्नरला अॅशेस मालिकेत अपयश आले असले तरी त्यानं ट्वेंटी-20त दमदार कमबॅक केला. त्यानं 56 चेंडूंत 10 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 100 धावा केल्या. 

वॉर्नरच्या फटकेबाजीसह या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलचे अतरंगी शॉट्सही पाहायला मिळाले. मॅक्सवेलनं 28 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकारांच्या मदतीनं 221.42च्या स्ट्राईक रेटनं 62 धावा कुटल्या. तत्पूर्वी, फिंचने 36 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकार खेचून 64 धावा चोपल्या. ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी फिंच, मॅक्सवेल आणि शेन वॉटसन यांनी हा पराक्रम केला आहे.  श्रीलंकेच्या कसून रंजितानं 4 षटकांत 75 धावा देत सर्वात महागड्या गोलंदाजाचा मान पटकावला.   

लक्ष्याचा पाठलाग करताना मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी लंकेची आघाडीची फळी नेस्तानाबुत केली. लंकेचे पाच फलंदाज 50 धावांत माघारी परतले होते. त्यानंतर फिरकीपटू अॅडम झम्पानं लंकेच्या डावाला खिंडार पाडली. त्यामुळे लंकेला 9 बाद 99 धावांपर्यंतच मजल मारता आली. स्टार्क व कमिन्स यांनी प्रत्येकी दोन, तर झम्पानं 3 विकेट्स घेतल्या.  

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरअ‍ॅरॉन फिंचग्लेन मॅक्सवेलआॅस्ट्रेलियाश्रीलंका