चेन्नई, दि. 12 - भारत दौ-यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्याच सराव सामन्यात दमदार प्रदर्शन करताना अध्यक्षीय संघाचा 103 धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय अध्यक्षीय संघासमोर विजयासाठी 348 धावांचे लक्ष्य ठेवले होतं. या धावसंखेचा पाठलाग करताना यजमान संघ 244 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियन संघाच्या तुलनेत भारतीय अध्यक्षीय संघ कमकुवत आहे. मोठ्या धावसंखेचा पाठलाग करताना ठराविक अंतराने अध्यक्षीय संघातले फलंदाज बाद झाल्यामुळे यजमान संघ ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करु शकला नाही. श्रीवत्स गोस्वामी 43 आणि मयांक अग्रवाल 42 यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाकडून अॅश्टन अॅगर 44 धावांच्या मोबदल्यात 4 फलंदाजांना माघारी झाडले.
प्रथम फलंदाजी करताना कांगारुनं डेव्हीड वॉर्नर (64), कर्णधार स्मिथ (55), टीएम हेड (65), मार्कस स्टोइनिस (76), मॅथ्यू वेड (45) यांच्या फंलदाजीच्या जोरावर 347 धावांचा डोंगर उभा केला होता. ऑस्ट्रेलियाच्या संघातील 5 फलंदाजांनी सामन्यात अर्धशतक झळकावताना अध्यक्षीय संघाची गोलंदाजी फोडून काढली. भारताकडून कुशांग पटेल, वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. अवेश खान, कुलवंत खेज्रोलिया आणि अक्षय कर्नेवार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. कुशांग पटेल आणि कर्नेवार महागडे गोलंदाज ठरले. दोघांच्या सहा षटकात अनुक्रमे 58 आणि 59 धावा चोपून काढल्या.
17 सप्टेंबपासून भारत-ऑस्ट्रेलियामध्ये पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेला सुरुवात होत आहे.