Join us

१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

Travis Head, AUS vs SA ODI: 'चारशेपार' मजल मारणाऱ्या पराक्रमी ऑस्ट्रेलियाचा विक्रमी विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 09:28 IST

Open in App

Travis Head, AUS vs SA ODI: मॅके (ऑस्ट्रेलिया): पहिल्या तीन फलंदाजांनी झळकावलेल्या धडाकेबाज शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने रविवारी झालेल्या मालिकेतील अखेरच्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा तब्बल २७६ धावांनी धुव्वा उडविला. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातला दक्षिण आफ्रिकेचा हा सर्वांत मोठा पराभव ठरला. ट्रॅव्हिस हेड सामनावीर तर दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज मालिकावीर ठरला.

ट्रॅव्हिस हेड (१४२), कर्णधार मिचेल मार्श (१००) आणि कॅमेरून ग्रीन (नाबाद ११८) यांच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने दोन गडी गमावून ४३१ धावांचा डोंगर उभारला. वनडे क्रिकेटमधील ही त्यांची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. विशेष म्हणजे, याआधी याच संघाला मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये २०० धावांचा टप्पाही पार करता आला नव्हता. त्यानंतर अष्टपैलू कूपर कॉनोलीने २२ धावांत ५ बळी घेत दक्षिण आफ्रिकेला २४.५ षटकांत १५५ धावांवर गुंडाळले.

दक्षिण आफ्रिकेसाठी डेवाल्ड ब्रेविसने सर्वाधिक ४९ धावा केल्या. कॉनोलीच्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजीला खिंडार पाडले.

ऑस्ट्रेलियन फलंदाजांची शतके

ट्रॅव्हिस हेड : १४२ धावा (१०३ चेंडू, १७ चौकार, ५ षटकार)मिचेल मार्श: १०० धावा (१०६ चेंडू, ६ चौकार, ५ षटकार)कॅमेरून ग्रीन : नाबाद ११८ धावा (५५ चेंडू, ६ चौकार, ८ षटकार)

सामन्यातील ठळक मुद्दे

  • ऑस्ट्रेलियाची ही धावसंख्या त्यांच्या आतापर्यंतच्या ४३४/४ या सर्वोच्च वनडे धावसंख्येनंतर (जी त्यांनी २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच उभारली होती) दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी ठरली.
  • वनडे क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाच्या अव्वल तीन फलंदाजांनी एकाच डावात शतके ठोकली.
  • हेड आणि मार्श यांनी ३४ षटकांत एकही गडी न गमावता २५० धावांची जबरदस्त सलामी दिली.
  • ग्रीनने ऍलेक्स कॅरीसोबत (नाबाद ५० धावा, ३७ चेंडू) १६४ धावांची तुफानी भागीदारी केली.
  • ऑस्ट्रेलियाने शेवटच्या ६० चेंडूंमध्ये एकही बळी न गमावता १२६ धावा काढल्या.
  • दक्षिण आफ्रिकेच्या क्चेना मफाकाने त्याच्या सहा षटकांत ७३ धावा दिल्या.
  • विआन मुल्डरने सात षटकांत २३ धावा दिल्या.
टॅग्स :आॅस्ट्रेलियाद. आफ्रिका