Join us

AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!

AUS vs SA 3rd ODI: मिचेल मार्शने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 11:48 IST

Open in App

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना सुरू झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलिया सध्या ०-२ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे, क्लीन स्वीप (३-० ने पराभव) टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ मैदानात उतरला आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ मालिका ३-० अशा फरकाने जिंकून इतिहास रचण्याच्या संधीवर आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असून, तो मालिकेचा निकाल निश्चित करणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवताना मिचेल मार्शने पहिल्यांदाच नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी कर्णधार म्हणून त्याने टी-२० क्रिकेटमध्ये १५ आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६ वेळा नाणेफेक जिंकले. परंतु, प्रत्येक वेळी त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात त्याने आपला हा पॅटर्न बदलून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. मार्श आतापर्यंत टी-२० मध्ये २७ आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. सध्या तो त्याच्या १२ व्या एकदिवसीय सामन्याचे कर्णधारपद भूषवत आहे.

ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका आधीच गमावली असून आता त्यांचा मुख्य उद्देश क्लीन स्वीप टाळण्याचा आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला ९८ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही त्यांना ८४ धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. या दोन्ही मोठ्या पराभवांनंतर, ऑस्ट्रेलियन संघ मालिकेतील अखेरचा सामना जिंकून आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी मैदानात उतरला आहे.

ऑस्ट्रेलियाची प्लेईंग इलेव्हन: ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिश (यष्टीरक्षक), अ‍ॅलेक्स केरी, कूपर कॉनॉलीला, झेवियर बार्टलेट, शॉन अ‍ॅबॉट, नॅथन एलिस, अ‍ॅडम जम्पा.

दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग इलेव्हन: रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), एडेन मार्कराम, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जॉर्जियो, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेव्हिस, वियान मुल्डर, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, सेनुरन मुथुसामी, क्वेना म्फाका.

टॅग्स :ऑफ द फिल्डआॅस्ट्रेलियाद. आफ्रिका