Join us  

AUS vs PAK: डेव्हिड वॉर्नरची शेवटची 'इनिंग'! चाहत्याला खास भेट देऊन जिंकली मनं 

डेव्हिड वॉर्नरने त्याच्या धडाकेबाज खेळीने क्रिकेट प्रेमींच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 4:28 PM

Open in App

मेलबर्न : सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाने विजयी सलमी दिली. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आधीच क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वॉर्नर सध्या त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळत आहे. मेलबर्न येथे सुरू असलेल्या सामन्यात यजमान संघाने मजबूत पकड बनवली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आणि ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात बाद झाल्यानंतर वॉर्नरने चिमुकल्या चाहत्याला ग्लोव्ह्ज भेट म्हणून दिले. 

दुसऱ्या डावात साजेशी कामगिरी करण्यात वॉर्नरला अपयश आले. पहिल्या डावात ३८ धावा करणारा वॉर्नर दुसऱ्या डावात केवळ ६ धावा करून तंबूत परतला. अखेरच्या कसोटी सामन्यादरम्यान, एमसीजी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी वॉर्नरला उभं राहून निरोप दिला. दुसऱ्या डावात बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनकडे परतत असताना ऑस्ट्रेलियन सलामीवीराने एका चाहत्याला त्याचे ग्लोव्ह्ज दिले अन् क्रिकेट विश्वाची मनं जिंकली. खरं तर याच मैदानावर वॉर्नरने आपल्या ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. २००९ मध्ये सुरू झालेला वॉर्नरचा हा प्रवास अप्रतिम राहिला. आतापर्यंत त्याने ३७१ सामने खेळले असून अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. 

वॉर्नर अन् कसोटी क्रिकेट :

क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये डेव्हिड वॉर्नरने सामन्यांचेही शतक झळकावले. त्याने ११० कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये २६ शतके आणि ३६ अर्धशतके झळकावण्यात त्याला  यश आले. पाकिस्तानविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३१८ धावा केल्यानंतर पाकिस्तानी संघ अवघ्या २६४ धावांत तंबूत परतला. त्यामुळे यजमान संघाला ५४ धावांची आघाडी मिळाली. तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियन संघाने ६२.३ षटकांत ६ बाद १८७ धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानची डोकेदुखी वाढली असून पाहुण्या संघासमोर तगडे आव्हान ठेवण्याचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाचे असेल. कांगारूंनी २४१ धावांची आघाडी घेतली आहे.

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरआॅस्ट्रेलियापाकिस्तान