आयपीएलच्या मेगा लिलावासाठी ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यातील स्टार अष्टपैलू खेळाडूनं पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याच्या माध्यमातून परफेक्ट ऑडिशन दिलीये. होबार्टच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने पाकला व्हाइट वॉश दिला. या सामन्यात मार्कस स्टॉयनिसनं पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाी करत मेगा लिलावाआधी धमाका केला आहे.
स्टॉयनिसनं धु धु धुतलं; २७ चेंडूत ठोकल्या ६१ धावा
पाकिस्तानच्या संघाने ठेवलेल्या ११८ धावांचा पाठलाग करताना स्टॉयनिसनं २७ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. पाकिस्तान विरुद्धचे चौथे अर्धशतक त्याने अवघ्या २३ चेंडूत साजरे केले. त्याची ही नाबाद अर्धशतकी खेळी ५ चौकार आणि ५ षटकारांसह बहरलेली होती. आयपीएल मेगा लिलाव अवघ्या काही दिवसांवर असताना त्याच्या भात्यातून आलेली खेळी त्याचा भाव वाढवणारी आहे.
LSG कडून गत हंगामातील कामगिरी
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू आयपीएलच्या गत हंगामात लखनऊ सुपर जाएंट्स संघातून खेळताना दिसला होता. मार्कस स्टॉयनिस यानं गत हंगामात लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळताना आपल्या आयपीएल कारकिर्दीतील नाबाद १२४ धावांची खेळी केली होती. या शतकी खेळीसह २ अर्धशतकाच्या मदतीने त्याने १४ सामन्यात ३८८ धावा केल्या होत्या. LSG कडून ३ हंगामात त्याच्या खात्यात १३ विकेट्स जमा आहेत. १० कोटींच्या या गड्याला LSG नं रिलिज केले होते. पाक विरुद्धची त्याची स्फोटक खेळी पाहिल्यावर या फ्रँचायझी संघाला त्याला रिटेन न करून मोठी चूक केलीये, असं वाटू शकतं.
IPL मेगा लिलावात स्टॉयनिसची मूळ किंमत किती माहितीये?
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात मार्कस स्टॉयनिस हा २ कोटी क्लबमधील मोजक्या खेळाडूंच्या यादीत आहे. पाकिस्तान विरुद्धच्या तुफान फटकेबाजीनं तो मेगा हंगामात किती कोटींपर्यंत मजल मारणार ते पाहण्याजोगे असेल. २०२२ पासून ते २०२४ पर्यंत लखनऊ सुपर जाएंट्सच्या ताफ्यातून खेळणारा स्टॉयनिस २०१८ मध्ये पंजाब, २०१९ मध्ये बंगळुरु, २०२०-२१ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात दिसला होता.