Join us

Aus vs Pak: ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा फडशा पाडला; पहिल्या कसोटीत दणदणीत विजय

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान पहिल्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियानं दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 13:11 IST

Open in App

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान पहिल्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियानं दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं एका डावात कुटलेल्या 580 धावा पाकिस्तानला दोन्ही डावांत मिळूनही करता आल्या नाही. बाबर आझमचे शतक आणि मोहम्मद रिझवानच्या 95 धावांच्या खेळीनंतरही पाकिस्तानला एक डाव व 5 धावांनी हार मानावी लागली. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 240 धावा केल्या. असाद शफिकनं सर्वाधिक 76 धावा करताना पाकिस्ताचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क ( 4/52), पॅट कमिन्स ( 3/60) आणि जोश हेझलवूड ( 2/46) यांनी पाकिस्तानला धक्के दिले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियानं पाक गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. डेव्हिड वॉर्नरनं 296 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीनं 154 धावा कुटल्या. जोस बर्नचे शतक तीन धावांनी हुकलं. त्यानं 166 चेंडूंत 10 चौकारांसह 97 धावा केल्या. पण, या सामन्यात भाव खाल्ला तो मार्नस लॅबुश्चॅग्नेनं... त्यानं कसोटीतील पहिले शतक झळकावताना 185 धावांची खेळी केली. 279 चेंडूंत त्यानं 20 चौकार मारले. मॅथ्यू वेडनं 60 धावांची खेळी करताना ऑस्ट्रेलियाला 580 धावांपर्यंत मजल मारून दिली.

पाकिस्तानच्या यासिर शाहनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. शहीन शाह अफ्रिदी आणि हॅरीस सोहैल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावातही पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक राहिली. सलामीवीर शान मसूदनं 42 धावा करताना संघाच्या आशा कायम राखल्या. पण, मधल्या फळीचे तीन फलंदाज एकेरी धावा करून माघारी परतले. बाबर आझम आणि रिझवान यांनी पाकच्या आशा पल्लवीत केल्या. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी केली. आझम 173 चेंडूंत 13 चौकारांच्या मदतीनं 104 धावांत माघारी परतला. रिझवान आणि यासिर यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी धावा जोडल्या. यासिरचं शतक मात्र 3 धावांनी हुकलं. रिझवान माघारी परतल्यानंतर पाकचा दुसरा डाव 335 धावांवर गुंडाळण्यात ऑस्ट्रेलियाला यश मिळालं. हेझलवूड ( 4/63), मिचेल स्टार्क ( 3/73) आणि पॅट कमिन्स ( 2/69) यांनी पाकचा धाव गुंडाळला.

टॅग्स :आॅस्ट्रेलियापाकिस्तान