Join us  

Aus vs Pak: पाकिस्तानची टाय टाय फिश... ऑस्ट्रेलियानं पुन्हा डावाच्या फरकानं लोळवलं

ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या कसोटीतही पाकिस्तानला डावाच्या फरकानं पराभूत केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 2:18 PM

Open in App

ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या कसोटीतही पाकिस्तानला डावाच्या फरकानं पराभूत केलं. डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद त्रिशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं कुटलेल्या 589 धावांचा पाकिस्तानला दोन्ही डावांत पाठलाग करता आला नाही. डे नाइट कसोटीत ऑसी गोलंदाजांनी पाकच्या फलंदाजांना खेळपट्टीवर फार काळ टिकूच दिले नाही. 

पहिल्या कसोटीत पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 240 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरनं 296 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीनं 154 धावा कुटल्या. मार्नस लॅबुश्चॅग्नेनं कसोटीतील पहिले शतक झळकावताना 185 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाला 580 धावांपर्यंत मजल मारून दिली. पाकिस्तानचा दुसरा डाव 335 धावांवर गुंडाळण्यात ऑस्ट्रेलियाला यश मिळालं. हेझलवूड ( 4/63), मिचेल स्टार्क ( 3/73) आणि पॅट कमिन्स ( 2/69) यांनी पाकचा धाव गुंडाळला. पाकिस्तानला एक डाव व 5 धावांनी हार मानावी लागली होती. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली होती.

दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं पहिला डाव 3 बाद 589 धावांवर घोषित केला आणि त्याचा पाठलाग करणारा पाकिस्तानचा पहिला डाव 302 धावांत गडगडला. ऑसींच्या खेळीत वॉर्नरचे त्रिशतक महत्त्वाचे ठरले. कसोटी क्रिकेटमध्ये वॉर्नरनं प्रथमच त्रिशतक झळकावले. त्यानं पाक गोलंदाजांची धुलाई करून नाबाद 335 धावा कुटल्या. त्यानं 418 चेंडूंत 39 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 335 धावांची विक्रमी खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली.  दुसऱ्या डावातही पाकिस्तानची घसरण सुरूच राहिली. नॅथन लियॉनने पाकचा निम्मा संघ माघारी पाठवला. पाकिस्तानला दुसऱ्या डावात 239 धावा करता आल्या. त्यामुळे त्यांना एक डाव व 48 धावांनी पराभव पत्करावा लागला. 

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कनं 6, तर पॅट कमिन्सनं तीन विकेट्स घेतल्या होत्या. पाकिस्तानचा दुसऱ्या डावात ऑसींच्या नॅथन लियॉननं पाच, तर जोश हेझलवूडनं तीन विकेट्स घेतल्या. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात शान मसूद ( 68) आणि असद शफीक ( 57) यांनी संघर्ष केला. 

टॅग्स :आॅस्ट्रेलियापाकिस्तानडेव्हिड वॉर्नर