Join us

उस्मान ख्वाजाने बुटावर लिहिलेल्या 'त्या' वाक्यावरून उडाली खळबळ, नक्की प्रकरण काय?

AUS vs PAK 1st Test: मैदानात खेळायला उतरतानाही बांधली काळी पट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 13:53 IST

Open in App

Usman Khawaja Shoes Black Armband, AUS vs PAK 1st Test: ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान यांच्यात पहिल्या कसोटीला आज सुरूवात झाली. पहिला सामना पर्थच्या मैदानावर सुरू असून त्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याच्या दंडावर असलेल्या काळ्या पट्टीने लक्ष वेधले. इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी तशी पट्टी बांधली नसताना फक्त उस्मान ख्वाजाने तसे का केले? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला. जाणून घेऊया त्यामागेच कारण.

ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा याला एका विशिष्ट प्रकारचे शूज घालण्याची परवानगी होती. त्या शूजवर 'सर्वांच्या जीवाची किंमत समान आहे' (All lives are same) असा संदेश लिहिला होता. ICC ने अशा प्रकारचे शूज घालण्याची परवानगी नाकारली. त्यानंतर पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेच्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी तो काळी पट्टी बांधून मैदानात आला. 'सर्वांच्या जीवाची किंमत समान आहे' असा संदेश त्याने सध्या चालू असलेल्या इस्रायल-हमास युद्धाबाबत लिहिला होता. गाझा पट्ट्यातील लोकांच्या जीवासंदर्भात संपूर्ण जगाने मिळून ठोस उपाययोजना केली पाहिजे असा त्याचं म्हणणं होतं. त्यामुळेच सराव सत्रात घातलेल्या शूजवर 'स्वातंत्र्य हा मानवी हक्क आहे' असा संदेशही लिहिलेला होता.

ICC ने का नाकारली परवानगी?

दरम्यान, ICC नियम सांघिक पोशाख किंवा उपकरणांवर राजकीय किंवा धार्मिक विधाने प्रदर्शित करण्यास परवानगी देत ​​​​नाही. ख्वाजाने सांगितले की वैयक्तिक किंवा सांघिक बंदी टाळण्यासाठी तो नियमांचे पालन करणार आहे. त्यामुळेच आयसीसीच्या निर्णयाला आव्हान न देता त्याने काळी पट्टी बांधली.

ख्वाजाने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'स्वातंत्र्य हा मानवी हक्क आहे आणि सर्वांचे अधिकार समान आहेत. माझा मुलभूत हक्कांवर व अधिकारांवर विश्वास आहे. ते मी कधीच थांबवणार नाही.'

कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. उस्मान ख्वाजाने पहिल्या दिवशी डेव्हिड वॉर्नरसोबत 126 धावांची भागीदारी केली. शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी ख्वाजाने 41 धावा केल्या.

टॅग्स :ऑफ द फिल्डइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षइस्रायल - हमास युद्धइस्रायलपाकिस्तानआॅस्ट्रेलिया