Join us
Daily Top 2Weekly Top 5

AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 20:25 IST

Open in App

PAK vs AUS ODI Series : पहिल्या वन डे सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव केला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या या लढतीत पाकिस्तानी गोलंदाजांनी संघर्ष केला पण पॅट कमिन्सने त्यांच्या तोंडचा घास पळवला. पाकिस्तानने दिलेल्या २०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कांगारुंना घाम फुटला. शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ आणि नसीम शाह या पाकिस्तानच्या त्रिकुटाने यजमान संघाच्या फलंदाजांची डोकेदुखी वाढवल्याने सामना चुरशीचा झाला. यामुळे पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने सामन्यानंतर एक मोठे विधान केले.

मोहम्मद रिझवान म्हणाला की, ऑस्ट्रेलियाला नशिबाची साथ मिळाली म्हणूनच त्यांचा पहिल्या सामन्यात विजय झाला. तसेच परिस्थिती कोणतीही असली, धावसंख्या कमी असली तरी अखेरपर्यंत लढायचे या हेतूने आम्ही मैदानात उतरतो, असे रिझवानने त्यासंदर्भातील प्रश्नावर म्हटले. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी डिलेड येथे होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोर मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान असेल, तर ऑस्ट्रेलिया विजयरथ कायम ठेवून मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी दरम्यान, तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील पहिला सामना चुरशीचा झाला. मेलबर्न वन डेमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा २ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने ४६.४ षटकांत २०३ धावा केल्या. पाकिस्तानकडून यष्टिरक्षक फलंदाज तथा कर्णधार मोहम्मद रिझवानने ७१ चेंडूत सर्वाधिक ४४ धावांची सर्वोच्च खेळी खेळली. नसीम शाहने ३९ चेंडूत ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर बाबर आझमने ४४ चेंडूत ३७ धावांचे योगदान दिले. पाकिस्तानच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, पण त्याचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर त्यांना करता आले नाही. त्यामुळे पाकिस्तानला मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाने ३३.३ षटकांत ८ गडी राखून लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाकडून यष्टीरक्षक फलंदाज जोश इंग्लिसने सर्वाधिक ४९ धावा केल्या. याशिवाय स्टीव्ह स्मिथने ४४ धावांचे योगदान दिले. तर पॅट कमिन्सने ३२ धावांची नाबाद खेळी केली.

टॅग्स :आॅस्ट्रेलियापाकिस्तान