Aus vs Nz Steve Smith : स्टीव्हन स्मिथच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वन डे सामन्यात न्यूझीलंडसमोर विजयासाठी २६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. विराट कोहली, स्मिथ, जो रूट व केन विलियम्सन हे या दशकातील फनटास्टीक फोर खेळाडू मानले जातात. ते त्यांच्या राष्ट्रीय संघासाठी नायक आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या कामगिरीकडे जगाचं लक्ष असते. विराटने आशिया चषक २०२२ स्पर्धेत शतकांचा दुष्काळ संपवला अन् १०२१ दिवसांनी ७१वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. स्मिथने आज चाळीसावे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले, परंतु शतकापेक्षा त्याच्या समयसूचकतेची आणि खेळाची जाण असलेल्या कृतीची चर्चा अधिक रंगली.
आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळणारा कर्णधार अॅरोन फिंच ( ५) पुन्हा अपयशी ठरला. टीम साऊदीने त्याचा त्रिफळा उडवला. जोश इंग्लिसही ( १०) लगेच माघारी परतल्याने ऑस्ट्रेलियाची अवस्था २ बाद १६ अशी झाली. त्यानंतर स्मिथ व मार्नस लाबुशेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. लाबुशेन ७८ चेंडूंत ५२ धावांवर बाद झाला. सामन्याच्या ३८व्या षटकात स्मिथने जिमी निशॅमने टाकलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमापार पाठवला. त्यानंतर लगेचच त्याने अम्पायरला ३० यार्डाबाहेर ५ खेळाडू उभे असल्याचे मोजून दाखवले आणि No Ball असल्याचे जाहीर करण्यास सांगितले. अम्पायरला त्यांची चूक कळली अन् त्यांनी NO Ball दिला. स्मितच्या या चतुराईचे सोशल मीडियावर कौतुक होतेय.
स्मिथने १३१ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारासह १०५ धावा केल्या. अॅलेक्स केरीने नाबाद ४२ धावा करताना ऑस्ट्रेलियाला ५ बाद २६७ धावांचा टप्पा गाठून दिला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा निम्मा संघ ११२ धावांत तंबूत परतला आहे. फिन अॅलन ३५ धावा, डेव्हॉन कॉनवे २१ धावा व कर्णधार केन विलियम्सन २७ धावा करून माघारी परतले आहेत.