Join us

संघांचे आदरातिथ्य नव्हे, प्रेक्षक हाच मुख्य मुद्दा; ऑस्ट्रेलियाच्या क्रीडामंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

‘परिस्थितीची जाणीव ठेवून आम्ही खेळाडूंकडून काही प्रमाणात सहकार्य मागू शकतो. सर्वांसाठी अत्यावश्यक असलेल्या नियमांचे पालन करू शकतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 00:08 IST

Open in App

मेलबोर्न : टी-२० विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांचे आदरातिथ्य कसे करायचे हे आव्हान आम्ही लीलया पेलू शकतो; मात्र प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये सामन्यांचे आयोजन योग्य ठरेल का, हा मुख्य मुद्दा असल्याची चिंता आॅस्ट्रेलियाचे क्रीडामंत्री रिचर्ड कोलबेक यांनी सोमवारी व्यक्त केली.

टी-२० विश्वचषकाचे आयोजन आणि भारतीय संघाचा आॅस्ट्रेलिया दौरा या दोन्ही बाबींवर गडद संकट कायम आहे. सध्या प्रवासावर निर्बंध कायम असून कोरोनाचा प्रकोप आणखी किती दिवस कायम राहील, हेदेखील निश्चित नाही. विश्वचषक आणि भारताचा दौरा रद्द झाल्यास क्रिकेट आॅस्ट्रेलियाला ३० कोटी डॉलरचे नुकसान होणार आहे.

स्थानिक रेडिओशी बोलताना कोलबेक म्हणाले, ‘मी आॅस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात मालिका होताना पाहू इच्छितो. याशिवाय विश्वचषकाचे आयोजनदेखील निर्धारित कालावधीत व्हायला हवे. संघांची निवास आणि प्रवास व्यवस्था मोठा मुद्दा नाही तर रिकाम्या स्टेडियममध्ये सामने पार पाडण्याची चिंता आहे. प्रेक्षकांविना सामन्यांची कल्पना कशी असेल, याचा विचार विश्व क्रिकेटला गंभीरपणे करावा लागेल. कोरोनावर नियंत्रणानंतर संघांचा निवास आणि प्रवास यावर विचार करता येईल.’

ते पुढे म्हणाले, ‘परिस्थितीची जाणीव ठेवून आम्ही खेळाडूंकडून काही प्रमाणात सहकार्य मागू शकतो. सर्वांसाठी अत्यावश्यक असलेल्या नियमांचे पालन करू शकतो. स्पर्धा आयोजित करू शकलो तर आवश्यक कालावधीसाठी शारीरिक अंतर पाळणे तसेच आरोग्याच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी, या सर्वांचे पालन होईल,’ अशी मला खात्री आहे. आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषदेने १६ देशांचा सहभाग असलेल्या टी-२० विश्वचषकाची तयारी सुरू असल्याचे सांगून आॅगस्टमध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. दुसरीकडे क्रिकेट आॅस्ट्रेलियाला आर्थिक नुकसान होण्यापासून वाचविण्यासाठी भारतीय संघाला प्रवास सवलत देण्याचा विचार पुढे आला होता. कोलबेक यांनी मात्र यावर आक्षेप नोंदवला. अन्य देशांना प्रवास सवलत देण्याबाबत सावधानता बाळगण्याची गरज असल्याचे त्यांचे मत आहे. 

टॅग्स :टी-20 क्रिकेटविश्वचषक ट्वेन्टी-२०