Join us  

बिग अपसेट! भारताचे Asia Cup च्या उपांत्य फेरीत पॅकअप, बांगलादेशचा नागिन डान्स

Asian Cricket Council Under-19s Asia Cup Semi Final - भारताच्या युवा संघाला आज १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धक्कादायक पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 6:16 PM

Open in App

Asian Cricket Council Under-19s Asia Cup Semi Final - भारताच्या युवा संघाला आज १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धक्कादायक पराभव पत्करावा लागला. बांगलादेशने ४ विकेट्सने राखून विजय मिळवताना स्पर्धेत आश्चर्यचकित निकालाची नोंद केली. बांगलादेशच्या अरिफूल इस्लाम व अहरार आमीन यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारताचा पराभव पक्का केला. भारताच्या पराभवामुळे अंतिम सामन्यात INDvsPAK सामन्याची उत्सुकताही संपली. 

संपूर्ण स्पर्धेत दबदबा राखणाऱ्या भारतीय संघाच्या फलंदाजांना उपांत्य फेरीत अपयश आले. आदर्श सिंग ( २), अर्शिन कुलकर्णी ( १), कर्णधार उदय शहरन ( ०) यांना एकेरी धावसंख्येवर माघारी जाण्यास भाग पाडले. मरूफ मृधाने या तिघांनाही तंबूची वाट दाखवली. प्रियांषू मोलिया ( १९) व सचिन धस ( १६) यांनी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, परंतु डॉलाह बोर्सनने दोघांनाही माघारी पाठवले. मुंबईचा मुशीर खान एकाबाजूने संयमी खेळ करताना दिसला आणि त्याला मुरुगन अभिषेकची साथ मिळाली. मुशीरने ६१ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने ५० धावा केल्या, तर मुरुगनने ७४ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारासह ६२ धावा केल्या. या दोघांच्या विकेटनंतर भारताचा संपूर्ण संघ ४२.४ षटकांत १८८ धावांत तंबूत परतला. बांगलादेशकडून मरुफने ४, बोर्सन व शेख जिबॉन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

१८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची अवस्थाही ३ बाद ३४ अशी झाली होती. पण, अरिफूल इस्लामने ९० चेंडूंत ९४ धावांची खेळी केली, तर आमीनने १०१ चेंडूंत ४४ धावा केल्या. या दोघांच्या शतकी भागीदारीने भारताला स्पर्धेबाहेर फेकले. बांगलादेशने ४२.५ षटकांत ६ बाद १८९ धावा करून विजय मिळवला. 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशएशिया कप 2023