Join us

आशिया चषक: पाकिस्तानला धूळ चारत क्रिकेटच्या पुनरुज्जीवनाची श्रीलंकेला सुवर्णसंधी

Asia Cup: फायनलमध्ये आज पाकिस्तानला धूळ चारण्याचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 06:45 IST

Open in App

दुबई : राजकीय आणि आर्थिक संकटाचा सामना करीत असलेला श्रीलंका सध्या सैरभैर झालेला आहे. नागरिकांमध्ये असलेली निराशेची मरगळ झटकून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची आणि जल्लोष करण्याची संधी द्यायची असेल तर श्रीलंका संघाला रविवारी आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये पाकिस्तानवर मात करावी लागणार आहे.

ही स्पर्धा एक प्रकारे श्रीलंकेच्याच यजमानपदाखाली खेळली जात आहे. आर्थिक आणि सुरक्षेच्या संकटामुळे त्यांनी आपल्या देशाऐवजी यूएईत आयोजन केले.  दासून शनाकाच्या नेतृत्वाखालील लंका संघ स्थानिक मैदानावर अंतिम सामना खेळला असता, तर त्यांच्यासाठी सुखद ठरले असते. तरीही ‘सुपर फोर’मधील त्यांचा तडाखा पाहता बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानपुढे लंकेचे अवघड आव्हान आहे, असेच म्हणावे लागेल. दुबईत पाक संघाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व पाठिंबा लाभतो. मात्र, फायनलमध्ये लंकेचे पारडे जड असेल. 

पाकिस्तानपुढे श्रीलंका असा संघ आहे जो  स्वत:च्या देशातील क्रिकेटला पुनरुज्जीवन देऊ इच्छितो. २०१४ ला टी-२० विश्वविजेता बनलेला हा संघ पुन्हा एकदा या प्रकारात अमीट छाप उमटविण्याचा प्रयत्न करेल. लंका क्रिकेटला मागील काही वर्षांत खराब संघ निवड आणि बोर्डातील राजकारणाचा फटका बसला. खेळाडूंनी मात्र स्वत:च्या खेळाला आक्रमकतेची जोड देत पुढे नेले.

दुष्मंत चामिरासारख्या अनुभवी गोलंदाजाच्या अनुपस्थितीतही लंकेचा मारा भक्कम वाटतो.  फलंदाजीत कुसाल मेंडिस आणि पाथुम निसांका ही शानदार सलामी जोडी आहे. दनुष्का गुणतिलका, भानुका राजपक्षे, शनाका आणि चमकात्ने करुणारत्ने हेदेखील उपयुक्त योगदान देत आहेत. आशिया चषकाच्या पाच सामन्यांत लंकेने आतापर्यंत २८ षटकार आणि ६२ चौकार मारले. यावरून त्यांच्या आक्रमकतेचा वेध घेता येईल.  महेश तीक्ष्णा आणि वानिंदू हसरंगा यांनी फिरकीची बाजू चोखपणे सांभाळली. दिलशान मधुशंका याचा वेगवान मारादेखील उत्कृष्ट ठरला.

दुसरीकडे पाकिस्तान संघ कर्णधार आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज बाबर आझमच्या फॉर्मबाबत चिंतेत आहे. आझमने पाच सामन्यांत केवळ ६३ धावा केल्या.  गोलंदाजीत मात्र पाकची बाजू उजवी वाटते. नसीम शाह, हारिस रौफ आणि मोहम्मद हसनैन, लेगब्रेक फिरकी गोलंदाज शादाब खान आणि डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाज यांनी प्रभावी कामगिरी केली. दुबईत मात्र नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरतो. अशावेळी आधी फलंदाजी करणाऱ्या संघाला नुकसान सोसावे लागू शकते. आधी फलंदाजी करताना पाकची कामगिरी ढेपाळली होती. भारत आणि लंकेविरुद्ध त्यांनी जे सामने गमावले त्यात त्यांनी सुरुवातीला फलंदाजी केली होती. आशिया चषकात श्रीलंका-पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत १६ सामने झाले. त्यात लंकेने ११, तर पाकने केवळ ५ सामने जिंकले.

टॅग्स :एशिया कप 2022श्रीलंकापाकिस्तान
Open in App