आशिया चषक २०२५ जिंकल्यानंतरही भारतीय क्रिकेट संघाला अद्याप विजेतेपदाची ट्रॉफी मिळालेली नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते भारतीय संघाने आणि नक्वींनी आपल्याशिवाय दुसऱ्या कोणी ही ट्रॉफी देण्यास नकार दिल्याने एक नवा वाद निर्माण झाला आहे. काल झालेल्या एसीसीच्या बैठकीत मोठा राडा झाला, यामध्ये नक्वींनी या ट्रॉफी आणि पदके एसीसी मुख्यालयात आणून द्यावीत असे भारताकडून सुनावण्यात आले. यावर आता नक्वींनी मी आणून देतो, पण सुर्यकुमारने तिथे येऊन ती घ्यावीत, असे नवे नाटक सुरु केले आहे.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) कार्यालयात येऊन ट्रॉफी स्वीकारावी, असा अजब पवित्रा नक्वी यांनी घेतला आहे. बीसीसीआयने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हे प्रकरण आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) जाण्याची शक्यता आहे.
काय आहे नेमका वाद?
आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यानंतर जेव्हा ट्रॉफी देण्याची वेळ आली, तेव्हा पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी दुसऱ्याच्या हातून ती भारतीय संघाकडे सुपूर्द करण्यास नकार दिला. यानंतर, ३० सप्टेंबर रोजी झालेल्या एसीसीच्या बैठकीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी हा मुद्दा उपस्थित करत ट्रॉफी तात्काळ भारताला देण्याची मागणी केली. मात्र, नक्वी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी नक्वी यांच्या या वागण्याला दुर्दैवी आणि खिलाडूवृत्तीच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. "आम्ही नक्वी यांच्याकडून ट्रॉफी न घेण्याचा निर्णय घेतला, याचा अर्थ असा नाही की ते ट्रॉफी आणि पदके स्वतःकडे ठेवू शकतात," असे सैकिया यांनी स्पष्ट केले. बीसीसीआयने नक्वी यांना ट्रॉफी भारताकडे सोपवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत, परंतु त्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
बीसीसीआय आक्रमक, प्रकरण आयसीसीकडे जाणार?
पीसीबी अध्यक्षांच्या या आडमुठेपणामुळे बीसीसीआयने आक्रमक भूमिका घेतली आहे. आशिया चषक जिंकूनही संघाला ट्रॉफी न मिळणे हा एकप्रकारे खेळाचा आणि विजेत्या संघाचा अपमान आहे. जर मोहसिन नक्वी यांनी लवकरच ट्रॉफी परत केली नाही, तर हे प्रकरण आयसीसीकडे नेण्याचा इशारा बीसीसीआयने दिला आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दोन देशांमधील राजकीय तणावाचे प्रतिबिंब क्रिकेटच्या मैदानावर आणि प्रशासकीय बाबींवरही दिसून येत असल्याचे हे उदाहरण आहे. आता या वादावर काय तोडगा निघतो आणि टीम इंडियाला त्यांची हक्काची ट्रॉफी कधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Controversy erupts as PCB chief Mohsin Naqvi refuses to hand over Asia Cup trophy unless Suryakumar Yadav collects it in person. BCCI considers escalating the matter to the ICC.
Web Summary : पीसीबी प्रमुख मोहसिन नकवी ने सूर्यकुमार यादव के व्यक्तिगत रूप से ट्रॉफी लेने पर अड़े, जिससे विवाद खड़ा हो गया। बीसीसीआई मामले को आईसीसी तक ले जाने पर विचार कर रहा है।