आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाने कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत अपवादात्मक कामगिरी केली. या स्पर्धेत टीम इंडियाने आपला अपराजित विजयी प्रवास कायम ठेवला. दरम्यान, सुपर ४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध सहा विकेट्सने विजय मिळवल्यानंतर, आता भारतीय संघ आपला पुढील सामना बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात युवा फलंदाज तिलक वर्माला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे, ज्यामुळे तो अनुभवी फलंदाज शिखर धवनला मागे टाकू शकतो.
भारतीय क्रिकेट संघातील आक्रमक फलंदाजांमध्ये तिलक वर्माचेही गणना केली जाते. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत २९ सामन्यातील २७ डावांमध्ये ४८ षटकार मारले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने आणकी तीन षटकार मारले तर, त्याच्या नावावर ५१ टी-२० षटकार नोंदवले जातील आणि अशी कामगिरी करणारा तो भारताचा १२वा फलंदाज ठरेल. महत्त्वाचे म्हणजे, शिखर धवनने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एकूण ५० षटकार मारले आहेत.
आशिया कपमधील कामगिरी
आशिया कप २०२५ मध्ये तिलक वर्माची फलंदाजीची कामगिरी चांगली राहिली. चार सामन्यांमध्ये तीन डावांमध्ये त्याने ४५ च्या सरासरीने ९० धावा केल्या आहेत. या स्पर्धेत त्याने ५ चौकार आणि ५ षटकार मारले आहेत. या स्पर्धेत त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय कारकीर्द
तिलक वर्माने २९ सामन्यांच्या २७ डावांमध्ये जवळपास ५० च्या सरासरीने ८३९ धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा हा अनुभव आणि आक्रमक शैली त्याला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हा मोठा टप्पा गाठण्यासाठी मदत करू शकते.