Sri Lanka vs Bangladesh, Super Fours, Match 13th : आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीतील विजयी हॅटट्रिकसह बांगलादेशच्या संघाला सुपर फोरमध्ये आणणाऱ्या श्रीलंकेच्या संघाला बांगलादेशनं ४ विकेट्सनं मात दिलीये. सुपर फोरमधील पहिला सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झाला. अखेरच्या षटकात ५ धावांची गरज असताना बांगलादेशच्या संघाने २ विकेट्स गमावल्या. शनाकाच्या अखेरच्या षटकातील २ चेंडूत एका धावेची गरज असताना एक धावबादची संधीही निर्माण झाली. पण तो डाव श्रीलंकेला साधता आला नाही अन् धाव पूर्ण करत बांगलादेशच्या संघाने सुपर फोरमधील पहिला सामना खिशात घातला. साखळी फेरीतील पराभवाची परतफेड करताना आपल्या मार्गातील अफगाणिस्तानचा अडथळा दूर करणाऱ्या श्रीलंकेच्या संघ आता बांगलादेशमुळे अडचणीत आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
खराब सुरुवातीनंतर बांगलादेशच्या ताफ्यातून दोघांची अर्धशतके
धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात तंझीन हसन तमीमच्या रुपात बांगलादेशच्या संघाला पहिला धक्का बसला. पण त्यानंतर लिटन दास आणि सैफ हसन यांनी ६० धावांची भागीदारी रचली. लिटन दास २३ धावांवर माघारी फिरल्यावर सैफ हसन याने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. बांगलादेशच्या संघाक़डून सलामीवीर सैफ हसन याने ४५ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची दमदार खेळी केली. याशिवाय तौहीद हृदोय (Towhid Hridoy) याच्या भात्यातून अर्धशतक पाहायला मिळाले. त्याने ३७ चेंडूत ५७ धावांची खेळी केली.
दसुन शनाकाचं नाबाद अर्धशतक ठरलं व्यर्थ
पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाकडून पथुन निसंका आणि कुसल मेंडिस यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनी चांगली सुरुवात केली. पण संघाच्या धावफलकावर ४४ धावा असताना पथुम निसंकाच्या रुपात तस्कीन अहमनं पहिला दक्का दिला. महेदी हसन याने कुसल मेंडिसची विकेट घेत श्रीलंकेला अडचणीत आणले . त्याने २५ चेंडूत ३४ धावा केल्या, संघ अडचणी असताना शनाकाच्या भात्यातून अर्धशतक आले. त्याने ३७ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांच्या जोरावर ६४ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर श्रीलंकेच्या संघाने निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १६८ धावा केल्या. कर्णधार असलंकानं १२ चेंडूत उपयुक्त २१ धावांची खेळी केली.