Join us

"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?

Saim Ayub Pakistan Cricket Asia Cup 2025: गेल्या तीन सामन्यात सॅम अयुब शून्यावर बाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 17:16 IST

Open in App

Saim Ayub Pakistan Cricket Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ मध्ये पाकिस्तानचा सलामीवीर सॅम अयुब टीकेचा धनी ठरताना दिसतोय. या स्पर्धेत अयुबने तीन सामन्यात आपले खातेही उघडलेले नाही. ओमानविरुद्धच्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर तो भारतीय संघाविरुद्धही 'गोल्डन डक'वर माघारी परतला. तिसऱ्या गट सामन्यातही संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध अयुबची दोन चेंडू खेळून शून्यावर तंबूत परतला. त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याच्यावर भयंकर टीका होत आहे. अशातच पाकिस्तानचा माजी क्रिकेटर राशिद लतीफने सॅम अयुबबद्दल एक विधान केले आहे.

सॅम अयुबने आशिया कपमध्ये एकही धाव घेतली नाही. परंतु त्याने त्याच्या फिरकी गोलंदाजीने सहा विकेट घेतल्या आहेत. पाकिस्तानी चाहते अयुबच्या फॉर्मबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा करत आहेत. तशातच माजी पाकिस्तानी कर्णधार राशिद लतीफने त्याची पाठराखण केली आहे. राशिद लतीफचा असा विश्वास आहे की सॅम अयुबसाठी हा वाईट काळ आहे आणि तो लवकरच निघून जाईल. या परिस्थितीचे वर्णन करताना हिंदी म्हण वापरत तो म्हणाला की, कधीकधी असेही घडते की एखादी व्यक्ती उंटावर बसलेली असते, पण इतक्या उंचावर असूनही त्याला कुत्रा चावतो. सॅम अयुबसोबतही असेच घडत आहे. तो उत्तम फलंदाज आहे. पण त्याचा वाईट काळ चालू असल्याने कमकुवत संघापुढेही तो शून्यावर बाद होताना दिसतोय.

प्रत्येकाचा वाईट काळ असतो!

रशीद लतीफ पुढे म्हणाला की, तो झेलबाद झाला. तेव्हा त्याचे फटके पाहा. तो असे नेहमी खेळत नाही. पण सध्या मात्र त्याला सूर गवसत नाहीये. त्याचे फटके चुकीचे बसत आहेत. प्रत्येकाचा वाईट काळ असतो. तो नक्कीच पुनरागमन करेल. पण त्याला थोडा वेळ ज्यायला हवा. सध्या त्याच्यावर दडपण न देणे हीच महत्त्वाची गोष्ट आहे.

दरम्यान, पाकिस्तानने गट फेरीतील दोन सामने जिंकून सुपर-४ मध्ये प्रवेश मिळवला आहे. या फेरीतील भारताविरूद्धचा सामना २१ सप्टेंबरला होणार आहे.

टॅग्स :आशिया कप २०२५पाकिस्तानसंयुक्त अरब अमिरातीभारत विरुद्ध पाकिस्तान