India vs Pakistan, Asia Cup 2025: ही क्रिकेट स्पर्धा अडचणीत आली आहे. ही स्पर्धा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयोजित केली होती आणि ती सप्टेंबर २०२५ मध्ये होणार होती. परंतु सध्याची परिस्थिती पाहता आशिया कप २०२५ देखील रद्द होऊ शकतो अशी चर्चा आहे. पीसीबीला या आर्थिक वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि आशियाई क्रिकेट परिषद (ACC) कडून एकूण ८.८ अब्ज रुपये महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. पण जर या वर्षी आशिया कप रद्द झाला, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) मोठे आर्थिक नुकसान होईल.
एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बजेटमध्ये ICCकडून मिळणारी रक्कम सुमारे २५.९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे ७.७ अब्ज रुपये) दर्शविली आहे. याशिवाय, पीसीबीला आशिया कपमधून १.१६ अब्ज रुपये आणि इतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमधून ७७ लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.
जर आशिया कप रद्द झाला तर PCB ला किती नुकसान?
सूत्रांनी सांगितले की, 'आयसीसी आणि आशिया कपमधून मिळणारे हे उत्पन्न पाकिस्तान क्रिकेटच्या आर्थिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.' म्हणजेच, जर आशिया कप झाला नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला १.१६ अब्ज रुपयांचे नुकसान होईल, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बिकट होईल. पीसीबी आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी सिंगापूरमध्ये झालेल्या आयसीसीच्या बैठकीला गेले नाहीत आणि त्यात ऑनलाइन पद्धतीनेही सहभागी झाले नाहीत. त्यामुळेच आशिया कपच्या तारीख आणि ठिकाणाबाबत अनिश्चितता अधिक वाढली आहे.
नक्वी यांच्याकडे एकाच वेळी अनेक महत्त्वाची पदे
मोहसिन नक्वी हे नाव सध्या पाकिस्तान क्रिकेटसाठी महत्त्वाचे आहे. ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. याव्यतिरिक्त, आशिया कपचे आयोजन होणाऱ्या ACC चे देखील अध्यक्ष मोहसिन नक्वी हेच आहेत. यातच भर म्हणून नक्वी हे पाकिस्तानचे सध्याचे गृहमंत्री देखील आहेत. PCBचे CEO सुमैर अहमद आयसीसीच्या बैठकीला गेले असले तरी त्यांना BCCI, क्रिकेट श्रीलंका आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
नक्वी यांचा हट्टीपणा महागात पडेल का?
बीसीसीआय, क्रिकेट श्रीलंका, अफगाणिस्तान आणि ओमान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे की ते २४ जुलै रोजी ढाका येथे होणाऱ्या एसीसीच्या बैठकीला त्यांचे प्रतिनिधी पाठवणार नाहीत. एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना ही बैठक ढाकामध्येच व्हावी अशी इच्छा आहे. जेणेकरून बीसीसीआय पीसीबीवर अनावश्यक दबाव टाकू नये. अशा परिस्थितीत, एसीसी अध्यक्षांची योजना यशस्वी होताना दिसत नाही आणि त्याचा फटका पाकिस्तानलाच बसणार आहे.५