यंदाच्या आशिया चषकात पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. मात्र, या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळणार नाही, असा दावा केला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
आशिया चषक २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाले असून, त्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात किमान दोन सामने निश्चित आहेत. पहिला सामना १४ सप्टेंबर रोजी होईल आणि दुसरा सामना २१ सप्टेंबर रोजी खेळवला जाण्याची शक्यता आहे. जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर, त्यांच्यात तिसरा सामनाही होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, केदार जाधवने एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना आपले मत मांडले.
केदार जाधव काय म्हणाला?
"माझ्या मते, भारताने पाकिस्तानविरुद्ध अजिबात खेळू नये. भारत जिथे खेळेल, तिथे जिंकेल यात शंका नाही, पण हा सामना खेळू नये आणि ते खेळणारही नाहीत. मी हे पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो." केदार जाधवच्या या दाव्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भारत- पाकिस्तान सामना रद्द होण्याची शक्यता
याआधी वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता, ज्यामुळे तो सामना रद्द झाला होता. आशिया चषकातही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का? याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
लवकरच भारतीय संघाची घोषणा
या संदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, बीसीसीआयची भूमिका आणि संघाची घोषणा १९ ऑगस्ट रोजी होणार असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आता भारत आणि पाकिस्तान हे संघ पुन्हा आमने-सामने येणार असल्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
Web Title: Asia Cup 2025: Kedar Jadhav on India- Pakistan Match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.