आशिया चषक स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानसोबत खेळण्यास तीव्र विरोध होत होता. अशा परिस्थितीत झालेल्या या लढतीत भारतीय संघाने पाकिस्तानवर ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं टाळून आपल्या मनातील संताप व्यक्त केला होता. त्यामुळे पाकिस्तानचा सध्या तिळपापड झालेला आहे. त्यातच आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू भारताविरोधात गरळ ओकली आहे.
एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आफ्रिदी म्हणाला की, जसं इस्राइल गाझासोबत वागत आहे, तसा भारत पाकिस्तानसोबत वागत आहे. तुम्ही दुसरं इस्राइल बनण्याचा प्रयत्न करत आहात. एक इस्राइल पुरेसा नाही आहे का? असा सवालही त्याने विचारला. तसेच जोपर्यंत यांचे ज्येष्ठ नेते आहेत तोपर्यंत हे असंच चालू राहील, असे भाकितही त्याने केले.
यावेळी भारतातील सत्ताधारी असलेल्या नरेंद्र मोदींवर टीका करताना आफ्रिदी म्हणाला की, मोदी सरकार सत्तेत राहण्यासाठी हिंदू-मुस्लिम खेळ खेळत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील जे सरकार आहे ते धर्माचं कार्ड खेळत आहे. हिंदू-मुस्लिम कार्ड खेळत आहे. तसेच स्वत:ला सत्तेत आणण्यासाठीची ही वाईट मानसिकता आहे.
यावेळी शाहिद आफ्रिदीने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं आवर्जुन कौतुक केलं. तो म्हणाला की, राहुल गांधी हे खूप सकारात्मक विचारसरणी असलेले व्यक्ती आहेत. ते चर्चेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला एकत्र घेऊन जाऊ इच्छित आहेत. मला राहुल गांधी यांच्याशी बोलायचं आहे, असेही आफ्रिदी याने पुढे सांगितले.