आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर ४ फेरीत काल झालेल्या लढतीत भारताने पाकिस्तानवर सहा गडी राखून मात केली होती. या पराभवानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केली असून, थेट आयसीसीकडे धाव घेतली आहे. कालच्या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर फकर जमां हा यष्टीरक्षक संजू सॅमसनकडे झेल देऊन बाद झाला होता. पंचांनी त्याला बाद ठरवत दिलेल्या निर्णयावरून खूप वाद झाला होता. आता याच विकेटचं निमित्त करत पाकिस्तानने आयसीसीच्या दारात धाव घेत अधिकृत तक्रार दाखल आहे.
याबाबत समोर येत असलेल्या वृत्तानुसार तिसरे पंच रुचिरा पल्लियागुरुगे यांनी फकर जमा याला चुकीच्या पद्धतीने बाद दिले होते, असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. सामन्यातील तिसऱ्या षटकामध्ये हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने फकर जमां याचा झेल टिपला होता. त्यानंतर निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवण्यात आला. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी जमा याला बाद ठरवले होते.
आक्रमक फलंदाजी करत असलेल्या फकर जमा याने ८ चेंडूत १५ धावा कुटल्या होत्या. दरम्यान तिसऱ्या पंचांनी रिप्लेमध्ये निरखून पाहिल्यावर चेंडू व्यवस्थित सॅमसनच्या ग्लव्हजमध्ये जाताना दिसला. त्यानंतर खात्री पटल्यावर पंचानी त्याला बाद दिले होते. दरम्यान, फकर जमाच्या विकेटवरून पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी आणि माजी क्रिकेटपटू निर्णयावर जोरदार टीका करत होते.
दरम्यान, सामना आटोपल्यावर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याने सांगितले की, फकर जमा बाद होता, असे मला वाटत नाही. जर फकर जमा त्यावेळी बाद झाला नसता तर पाकिस्तानच्या खात्यात किमान आणखी २० धावांची भर पडली असती. मात्र पंचांनी चुकीचा निर्णय दिला, असे मात्र म्हणणे त्याने टाळले.