आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर ४ फेरीत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहान याने केलेल्या गन सेलिब्रेशनमुळे वादाला तोंड फुटलं आहे. सामन्यात अर्धशतकी खेळी केल्यानंतर फरहानने हे गन सेलिब्रेशन केले होते. यावरून वाद झाल्यानंतरही फरहानचा माजोरडेपणा कायम असून, लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही असे त्याने म्हटले आहे.
भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान याने आक्रमक फलंदाजी केली होती. तसेच अर्धशतकी मजल गाठल्यावर फरहानने बॅटने गोळ्या झाडल्यासारखी अॅक्शन करून जोरदार सेलिब्रेशन केले होते. यावरून वाद निर्माण झाल्यावर आा फरहान याने या सेलिब्रेशनवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, मी जे काही सेलिब्रेशन केलं होतं. ते त्यावेळी घडलेली एक क्रिया होती. आता लोक काय म्हणतील, त्याबाबत मला काही पर्वा नाही.
पाकिस्तानचा स्पर्धेतील पुढील सामना श्रीलंकेसोबत होणार आहे. त्या सामन्यापूर्वी फरहान म्हणाला की, जर तुम्ही षटकारांचं म्हणाल तर तुम्हाला ते पुढेही खूप पाहायला मिळतील. तसेच मी जे काही गन सेलिब्रेशन केलं होतं, ती त्याक्षणी घडलेली तात्कालिक घटना होती. खरंतर मी ५० धावा काढल्यावर फारसं सेलिब्रेशन करत नाही. मात्र अचानक माझ्या डोक्यामध्ये आलं की काही तरी वेगळं करू आणि मग मी त्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं.
साहिबजादा फरहान पुढे म्हणाला की, यावर लोक काय प्रतिक्रिया देतील याची मला कल्पना नव्हती. खरं सांगायचं तर लोक काय म्हणतील याही पर्वाही मी केली नाही. बाकी सारं तुम्हाला माहितीच आहे. तुम्हाला जिथे खेळायचं आहे तिथे आक्रमक होऊन खेळलं पाहिजे. भारताविरुद्धच आक्रमक होऊन खेळलं पाहिजे. प्रत्येक संघाविरुद्ध आपण आक्रमक होऊन खेळलं पाहिजे. जसं आम्ही आज खेळलो, असेही त्याने सांगितले.