Asia Cup 2025 IND vs PAK Final: तिलक वर्माची अर्धशतकी खेळी अन् त्याला संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनी दिलेली उत्तम साथ याच्या जोरावर भारतीय संघाने दुबईचं मैदान मारत नवव्यांदा आशिया कपवर आपलं नाव कोरलं आहे. पाकिस्तानच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १४६ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. पण तिलक वर्मानंं दमदार फलंदाजी करत संघाला अडचणीतून बाहेर काढलं अन् संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या रिंकू सिंह याने विजयी धाव घेत टीम इंडियाचा विजय निश्चित केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तिलक वर्माची अविस्मरणीय खेळी
धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने अवघ्या २० धावांवर आघाडीच्या तीन विकेट्स गमावल्या होत्या. अभिषेक शर्मा अवघ्या ५ धावांवर माघारी फिरला. शुबमन गिलनं दुहेरी आकडा गाठला पण १२ धावांवर त्याच्या खेळीलाही ब्रेक लागला. या दोन्ही विकेट्स फहीम अशरफन घेतल्या. सूर्यकुमार यादवच्या रुपात शाहीन शाह आफ्रिदीनं भारताला मोठा धक्का दिला. पण त्यानंतर तिलक वर्मा शेवटपर्यंत टिकला अन् त्याने या सामन्यात ५३ चेंडूत नाबाद ६९ धावांची अविस्मरणी खेळी केली.
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
संजू शिवम दुबेची उपयुक्त खेळी
भारतीय संघ अडचणीत असताना संजू सॅमसन याने २१ चेंडूत २४ धावांची खेळी केली. ही खेळी साकारताना त्याने तिलक वर्माच्या साथीनं अर्धशतकी भागीदारी रचत पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले. बिग हिटर शिवम दुबे याने २२ चेंडूत ३३ धावांची दमदार इनिंग खेळली. २ चौकार आणि २ षटकारांसह त्यानेही तिलक वर्मासह अर्धशथकी भागीदारी रचली. तिलक वर्मासोबत तोच सामना फिनिश करेल. असे वाटत होते. पण फहीम अशरफच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. पण दुसऱ्या बाजूला तिलक वर्मानं मैं हु ना शो दाखवत मॅचमध्ये कोणतेही ट्विस्ट येणा नाही, याची खात्री करताना पाकिस्तानची पुन्हा एकदा जिरवली.
गोलंदाजीत कुलदीपचा 'चौकार', अखेरच्या १० षटकात पाक फलंदाजांना पळताभुई थोडी
फलंदाजीप्रमाणेच गोलंदाजीच्या वेळीही भारतीय संघ मागे पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. पाकिस्तानचा संघ बॅटिंग करत असताना पहिली विकेट मिळवायला १० षटके प्रतिक्षा करावी लागली. पण त्यांतर भारतीय गोलंदाजांनी पुढच्या १० षटकात पाकिस्तानच्या फलंदाजांनी पळताभुई करून सोडलं. त्यांना २० षटकेही पूर्ण खेळू दिली नाहीत. कुलदीप यादवनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.