आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवार २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या लढतीमधून भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहे. त्यामुळे या लढतीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. आधीच दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे या लढतीत दोन्ही संघातील खेळांडूंवर अधिकच दबाव असणार आहे. त्यामुळे या लढतीपूर्वी भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने भारतीय संघातील सहकाऱ्यांना खास सल्ला दिला आहे.
आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ फेरीमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना दुबईतील दुबई इंटरनॅशल स्टेडियममध्ये रात्री आठ वाजल्यापासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सूर्यकुमार यादव याला या लढतीचा दबाव कसा हाताळतोस, असं विचारलं असता सूर्यकुमार यादवने फोन आणि खोलीचा दरवाजा बंद करून झोपून जाणं हाच चांगला पर्याय आहे, असे सांगितले.
सूर्यकुमार यादव म्हणाला की, खोलीचा दरवाजा बंद करा, फोन बंद करा आणि झोपून जा, हा चांगला पर्याय आहे. हे बोलायला तसं सोपं आहे. पण कधी कधी हेही कठीण होतं. त्याचं कारण म्हणजे तुम्ही मित्रांना भेटता, मेजवानीला जाता, तिथे भेटीगाठी, चर्चा होतेच. तर काही खेळाडू असेही असतात जे या सर्व गोष्टी पाहणं पसंत करतात. अशा परिस्थितीत या गोष्टींपासून पूर्णपणे लांब राहणं शक्य होत नाही, असेही सूर्यकुमार यादव म्हणाला.
दरम्यान, आशिया चषक स्पर्धेच्या साखळी फेरीत गेल्या रविवारी भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते. त्या सामन्यावेळी भारतातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. तरीही प्रचंड दबावाचा सामना करत भारतीय संघाने पाकिस्तानवर सहजपणे विजय मिळवला होता.