Asia Cup 2025, IND vs PAK : भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेतील हायहोल्टेज सामन्यात दिमाखदार विजय मिळवला आहे. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं षटकार मारत भारतीय संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गोलंदाजीत पांड्या-बुमराहसह कुलदीप यादवची कमाल
हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहसह फिरकीपटू कुलदीप यादव, अक्षर पटेल यांच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संघ फक्त १२७ धावांपर्यंतच मजल मारू शकला. या धावसंख्येचा पाठलाग करताना अभिषेक शर्मानं पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत सामना पहिल्या तीन चार षटकातच भारताच्या बाजूनं वळवला. त्यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवनं अर्धशतकी भागीदारी रचत सामन्यावर पकड मिळवली. सूर्यकुमार यादवनं षटकार मारत मॅच अगदी दिमाखात जिंकली. पाकिस्तानकडून साहबजादा याने केलेल्या ४० धावा आणि शाहीन आफ्रिदीच्या ३३ धावा वगळता अन्य फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. कुलदीप यादवनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्तीनं १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.
आधी अभिषेक शर्मानं चोपलं, मग तिलक वर्मा अन् सूर्या दादा यांची जोडी जमली
पाकिस्तानच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना शुबमन गिलच्या रुपात भारतीय संघाने २२ धावांवर पहिली विकेट गमावली. पण अभिषेक शर्मानं १३ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकार मारत ३१ धावांच्या खेळीसह पाकिस्तान गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. दमदार सुरुवात करून तो माघारी फिरल्यावर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा ही जोडी जमली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी करत सामना टीम इंडियाच्या बाजूनं सेट केला. तिलक वर्मा ३१ चेंडूत ३१ धावा करून बाद झाल्यावर शिवम दुबेच्या साथीनं सूर्यानं सिक्सर मारत मॅच संपवली. सूर्यकुमार यादवनं ३७ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ४७ धावांची खेळी केली.
IND vs PAK सामन्याला विरोध अन् टीम इंडियावरील भावनिक दबाव
भारत--पाकिस्तान यांच्यातील लढत नेहमीच दोन्ही खेळाडूंवर दबावात आणणारी असते. ज्यात टीम इंडिया नेहमीच भारी ठरलीये. पण यावेळी टीम इंडियातील खेळाडूंवर अपेक्षांचे ओझे नव्हते तर पाकिस्तानसोबत खेळू नये, या मागणीमुळे भावनिक दबाव होता. या दबावात भारतीय संघाने दिमाखदार विजय नोंदवला आहे. त्यामुळे हा विजय आणखी खास ठरतो.
Web Title: Asia Cup 2025 IND vs PAK 6 th Match India won by 7 wkts Against Pakistan Suryakumar Yadav Hit Winning Six
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.