Asia Cup 2025 BAN vs SL 5th Match, Sri Lanka Won By 6 Wkts Agains Bangladesh : आशिया चषक स्पर्धेतील सलामीच्या लढतीत तुल्यबल बांगलादेशचा एकहाती पराभव करत श्रीलंकेच्या संघाने यंदाच्या हंगामात जेतेपदाच्या शर्यतीत आपली दावेदारी भक्कम केलीये. दुसरीकडे हाँगकाँगविरुद्धच्या लढतीत विजय मिळवून दुसऱ्या सामन्यातील एका पराभवामुळे बांगलादेशच्या संघावर स्पर्धेतून आउट होण्याचे संकट घोंगावत आहे. आता अफगाणिस्तान विरुद्ध त्यांच्यासाठी 'करो वा मरो'ची लढत असणार आहे. जर हा सामना गमावला तर ते स्पर्धेतून आउट होतील.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
श्रीलंकेच्या संघानं सामना अगदी सहज घातला खिशात
नुवान तुषारा अन् चमीराच्या भेदक माऱ्यानंतर हसरंगाने फिरकीत जादू दाखवून देत बांगलादेशच्या फलंदाजीतील हवा काढली. संघ अडचणीत सापडल्यावर जाकर अली ४१ (३४) आणि शमीन हुसैन ४२ (३४) या जोडीनं सहाव्या विकेटसाठी ८२ धावांची दमदार भागीदारी करत संघाच्या धावफलकावर १३९ धावा लावल्या. पण श्रीलंकेच्या संघानं १५ व्या षटकातील चौथ्याच चेंडूवर ६ विकेट्स राखून सामना सहज खिशात घातला.
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
खाते न उघडता दोन्ही सलामीवीर तंबूत; संघावर ओढावली नामुष्की
श्रीलंकेच्या संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्याच षटकात नुवान तुषारा याने तंझीन हसनला क्लीन बोल्ड करत बांगलादेशच्या संघाला पहिला धक्का दिला. दुसऱ्या षटकात चमीरानं परवेझ हुसैन इमॉनला तंबूत धाडले. संघाचे खातेही न उघडता दोन्ही फलंदाज तंबूत परतले. त्यानंतर कर्णधार लिटन दासनं दुहेरी आकडा गाठला. पण हसरंगाने २८ धावांवर त्याचाही खेळ खल्लास केला. तौहीद हृदोय ८ (९) आणि महेदी हसन ९ (७) स्वस्तात माघारी फिरल्यावर जाकर अली ४१ (३४) आणि शमीम हुसैन ४२ (३४) जोडी जमली. दोघांनी विकेट न गमावता सहाव्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी करत निर्धारित २० षटकात संघाच्या धावफलकावर १३९ धावा लावल्या होत्या.
निसंकाची फिफ्टी, कामिल मिशारानंही लुटली मैफील
बांगलादेशच्या संघानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. संघाच्या धावफलकावर फक्त १३ धावा लागल्या असताना कुसल मेंडिस अवघ्या ३ धावा करून माघारी फिरला. त्यानंतर सलामीवीर पथुम निसंका आणि कामिल मिशारा जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी रचत सामना श्रीलंकेच्या बाजूनं सेट केला. निसंकाने ३४ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५० धावा केल्या. दुसऱ्या बाजूला मिशारा ३२ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकार मारत ४६ धावांवर शेवटपर्यंत नाबाद राहिला.
पहिल्या विजयासह श्रीलंका सेफ झोनमध्ये; बांगलादेशला अफगाणिस्ताची भिती
आशिचा कप स्पर्धेत 'ब' गटात 'सुपर फोर'मधील दोन स्थानांसाठी तीन संघात तगडी फाइट आहे. बांगलादेशच्या संघाने पहिल्या दोन सामन्यातील एक सामना गमावला असून फक्त एकच सामना जिंकला आहे. साखळी फेरीत अखेरच्या सामन्यात त्यांच्यासमोर अफगाणिस्तानचे चॅलेंज असेल. हा संघ एका विजयासह सध्याच्या घडीला गुणतालिकेत सर्वात टॉपला आहे. त्यामुळे बांगलादेशसाठी पुढची लढत 'करो वा मरो'ची असेल. याउलट हा सामना गमावल्यावरही अफगाणिस्तानला श्रीलंकेविरुद्ध कमबॅकची संधी असेल. दुसऱ्या स्थानावर असलेल्या श्रीलंकेसमोर हाँगकाँगच्या रुपात एक पेपर अगदी सोपा आहे.