Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : १५ तासांत भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत सुपर ४ मधील दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला. भारताने नाणेफेक जिंकून श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांना पुरेशी विश्रांती मिळावी, या दृष्टीने कर्णधार रोहित शर्माने हा निर्णय घेतला आहे. आजच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शार्दूल ठाकूरच्या जागी अक्षर पटेल याला संधी दिली गेली आहे. श्रीलंकेने सलग १३ वन डे सामने जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे आणि त्यांची ही विजयी मालिका खंडीत करण्याच्या निर्धाराने भारतीय संघ मैदानावर उतरणार आहे.
शुबमन गिल आणि
रोहित शर्मा यांनी भारताला नेहमीप्रमाणे चांगली सुरुवात करून दिली. या जोडीने सोबत १००५+ धावांचा टप्पा ओलांडला. शुबमन व रोहित यांनी ९१.३ च्या सरासरीने या धावा केल्या आहेत आणि त्यात ४ शतकी व ४ अर्धशतकी भागीदारीचा समावेश आहे. भारताकडून सर्वात कमी १२ इनिंग्जमध्ये १०००+ धावांची भागीदारी करणारी ही पहिली जोडी ठरली. याआधी रोहित व लोकेश राहुल यांनी १४ इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला होता. कसून रंजिथाने टाकलेल्या ७व्या षटकात रोहितने नाकाच्या सरळ षटकार खेचून वन डे क्रिकेटमध्ये १००००+ धावांचा टप्पा ओलांडला. विराट कोहलीनंतर ( २०५ इनिंग्ज) सर्वात जलद १० हजार धावांचा विक्रम रोहितने ( २४१) नावावर केला. त्याने
सचिन तेंडुलकर ( २५९ ), सौरव गांगुली ( २६३) व रिकी पाँटिंग ( २६६) यांना मागे टाकले.