Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - दोन दिवसाच्या पावसाच्या खेळामुळे कंटाळलेल्या भारतीय चाहत्यांना अखेर आज आनंदाची बातमी मिळाली. विराट कोहली आणि दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या लोकेश राहुलच्या शतकी खेळीने आज कोलंबो दणाणून सोडले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल केली आणि पाकिस्तानला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. भारताच्या ३५६ धावांच्या ओझ्याखाली पाकिस्तानचा संघ आधीच अर्धमेला झाला होता आणि भारतीय गोलंदाजांनी त्यांची शिकार केली. भारताने हा सामना जिंकून सुपर ४ मध्ये खात्यात २ गुण जमा केले अन् फायनलच्या दिशेने पाऊल टाकले.
रोहित शर्मा ( ७६) व शुबमन गिल ( ५८) यांनी काल १२१ धावांची भागीदारी करून मजबूत पाया रचला होता अन् आज विराट व लोकेश यांनी शतकं झळकावून त्यावर धावांचा पाऊस पाडला. पाकिस्तानविरुद्ध भारताने २ बाद ३५६ धावा चोपल्या. विराट कोहलीने ९४ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद १२२ धावा केल्या आणि लोकेश राहुल १०६ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह १११ धावांवर नाबाद राहिला. प्रत्युत्तरात पाकिस्तानला जसप्रीत बुमराह व हार्दिक पांड्या यांनी सुरुवातीला धक्के दिले. इमाम उल हक ( ९) आणि बाबर आजम ( १०) माघारी परतल्यानंतर शार्दूल ठाकूरने त्याच्या पहिल्याच षटकात मोहम्मद रिझवानला ( २) माघारी पाठवले. 
त्यानंतर कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav) कमाल केली आणि पाकिस्तानची अवस्था अधिक बिकट केली. त्याने फखर जमानचा ( २७) त्रिफळा उडवला, सलमान आघाला ( २३) पायचीत केला, शादाब खान ( ६) व इफ्तिखार अहमद ( २३) यांना झेलबाद केले. ३० षटकांत पाकिस्तानची अवस्था ७ बाद ११९ अशी झालेली आणि त्यांना २० षटकांत २३८ धावांची गरज होती. त्यात कुलदीपने पाकिस्तानला आणखी एक धक्का दिला. फहीम अश्रफचा ( ४) दांडा त्याने उडवला अन् ८ बाद १२८ धावांवर पाकिस्तानने हार मानली. हॅरीस रौफ व नसीम शाह जखमी असल्याने फलंदाजीला नाही आले आणि भारताने २२८ धावांनी मॅच जिंकली.