Asia Cup 2022 : पाकिस्तान व हाँगकाँगवर विजय मिळवून भारतीय संघाने आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या सुपर ४ मध्ये जागा पक्की केली. बुधवारी झालेल्या सामन्यानंतर भारतीय खेळाडू विश्रांतीवर आहेत. आता त्यांचा मुकाबला थेट रविवारी होणार आहे. हाँगकाँग विरुद्ध पाकिस्तान यांच्यातल्या विजेत्या संघासोबत हा मुकाबला होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांना India vs Pakistan सामन्याची उत्सुकता आहे. पण, त्याआधी भारतीय संघ दुबईच्या किनाऱ्यावर धम्माल मस्ती करताना दिसले. भारतीय संघ दुबईच्या Palm Jameirah Resortमध्ये मुक्कामाला आहे. रेसॉर्टसमोरील चौपाटीवर भारतीय खेळाडू पोहोचले आणि तेथे त्यांनी कयाकिंग व सर्फींग केले.
Asia Cup 2022: भारतीय संघाचा थाट! दुबईत दिवसाला ५० हजार भाडं असलेल्या हॉटेलमध्ये मुक्काम
विराट कोहली, रोहित शर्मा व अन्य सदस्य विश्रांतीचा हा वेळ एन्जॉय करताना दिसले. BCCI ने सोशल मीडियावर भारतीय संघाच्या या धम्माल मस्तीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. काही खेळाडू व्हॉलीबॉलही खेळताना दिसत आहेत.
''हा आमचा विश्रांतीचा दिवस होता. राहुल द्रविड यांनी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. खूप मजा केली आणि रिलॅक्स झालो. प्रत्येक जण आनंदी दिसतोय. ही आमची क्रिकेट फॅमिली आहे. यात काही नवे सदस्य आहेत. अशा आऊटडोअर अॅक्टिव्हिटी होत राहिल्या, तर खेळाडूंचे बाँडिंग अजून वाढेल,''असे चहल म्हणाला. राहुल द्रविड खुर्चीवर खेळाडूंची ही मस्ती पाहत रिलॅक्स बसलेला दिसला.
भारत-पाकिस्तान पुन्हा ४ सप्टेंबरला एकमेकांना भिडणार
मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या पराभवानंतर भारतीय चाहत्यांना जल्लोष साजरा करण्याची संधी टीम इंडियाने रविवारी दिली. वर्ल्ड कपनंतर प्रथमच समोर आलेल्या पाकिस्तान संघाचा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने पराभव केला. या विजयाचा जल्लोष कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर पर्यंत रात्रभर सुरू होता. आता आणखी दोन वेळा अशी जल्लोषाची संधी भारतीय चाहत्यांना मिळणार आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातला हायव्होल्टेज सामना जगभरातील क्रिकेट चाहत्यांना हवा असतो. त्यामुळेच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील India-Pakistan सामन्याची तिकिट काही मिनिटांतच संपली आणि आता काळाबाजार सुरू झाला आहे. आशिया चषक स्पर्धेतही काल स्टेडियम हाऊल फुल होतं आणि आता आणखी दोन वेळा असा नजरा पाहायला मिळू शकतो.