Join us

Asia Cup 2022, IND vs SL: "त्याच्यासारख्या स्टार खेळाडूला तुम्ही इतक्या महत्त्वाच्या स्पर्धेत घरी कसं बसवू शकता?"; Ravi Shastri यांचा रोखठोक सवाल

टीम इंडिया आशिया चषकातून बाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 17:22 IST

Open in App

Asia Cup 2022, IND vs SL: भारतीय संघाला मंगळवारच्या सामन्यात आशिया चषक स्पर्धेतील सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या फेरीत अजिंक्य असलेल्या टीम इंडियाला सुपर-४ मध्ये आधी पाकिस्तानने पराभूत केले. त्यानंतर काल श्रीलंकेच्या संघाने शेवटच्या षटकात भारतीय संघाला अटीतटीच्या लढतीत धूळ चारली. कर्णधार रोहित शर्माच्या ४१ चेंडूत ७२ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने १७३ धावा केल्या. पण गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे श्रीलंकेने १७४ धावांचे आव्हान एक चेंडू आणि सहा गडी राखून पूर्ण केले. परिणामी, भारतीय संघ आता आशिय चषक स्पर्धेतून बाहेर फेकला जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. अशा परिस्थितीत भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री यांनी निवड समितीला संतप्तपणे एक महत्त्वाचा सवाल केला.

भारतीय संघाला प्रथम फलंदाजी मिळाल्यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोन मुंबईकर क्रिकेटपटूंनी तुफान फलंदाजी केली. त्यांच्या खेळीच्या जोरावरच भारताने १७०पार मजल मारली. गेल्या सामन्यात पाकिस्तान विरूद्ध भारतीय गोलंदाजांना १८२ च्या आव्हानाचा बचाव करता आला नव्हता. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यातही तसंच घडले. भारतीय गोलंदाजांना श्रीलंकन फलंदाजांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर रवी शास्त्री यांनी थेट संघ निवडीवरच प्रश्न उपस्थित केले.

संघ व्यवस्थापन आणि संघ निवड समितीचे लोक आशिया चषक स्पर्धेसारख्या इतक्या मोठ्या स्पर्धेसाठी केवळ ४ वेगवान गोलंदाजच कसे निवडतात? इतकंच नव्हे तर मोहम्मद शमीसारख्या (Mohammad Shami) एका अतिशय अनुभवी, प्रतिभावान आणि प्रभावी वेगवान गोलंदाजाला तुम्ही घरी कसं काय बसवू शकता, असा थेट सवाल त्यांनी निवड समितीला केला. टीम इंडिया आणि निवड समितीचा हा निर्णय माझं डोकं चक्रावून टाकणारा आहे, असेही रवी शास्त्री म्हणाले. याच मुद्द्याला जोडून, संघ निवड प्रक्रियेत मुख्य प्रशिक्षकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो का?, या प्रश्नालाही शास्त्रींनी उत्तर दिले. "मुख्य प्रशिक्षक हा संघ निवड समितीचा सदस्य नसतो. पण तो त्याचं मत नक्कीच सांगू शकतो", असे रवी शास्त्रींनी स्पष्ट केले.

भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांचा पर्याय कमी पडला का? असा सवाल रोहित शर्मालाही कालच्या सामन्यानंतर विचारण्यात आला होता. त्यावर रोहित शर्मा म्हणाला, "आवेश खानला संघात घेण्यासाठी त्याच्या अनेक प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. पण त्याची तब्येत बरी नसल्याने त्याच्याकडून खेळण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यामुळे अखेर आम्हाला तीन वेगवान गोलंदाजांना संघात स्थान देत खेळावे लागले."

टॅग्स :एशिया कप 2022रवी शास्त्रीरोहित शर्मामोहम्मद शामी
Open in App