Asia Cup 2022, IND vs PAK : रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला मुकण्याच्या शक्यतेची बातमी येऊन धडकली अन् टीम इंडियाच्या चाहत्यांची धडधड वाढली. जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर आधीच प्रश्नचिन्ह असताना जडेजाच्या बातमीने भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला. आशिया चषक स्पर्धेत जडेजाने पाकिस्तानविरुद्ध चांगली फलंदाजी केली होती, तर हाँगकाँगविरुद्धही त्याने क्षेत्ररक्षणात त्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले. पण, भारत-पाकिस्तान यांच्यातल्या Super 4 मधील लढतीपूर्वी जडेजाच्या आशिया चषक माघारीचे वृत्त BCCI ने दिले. त्यानंतर जडेजा वर्ल्ड कप स्पर्धेलाही मुकणार असल्याचे वृत्त शनिवारी समोर आले.
India vs Pakistan यांच्यातल्या रविवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याची पत्रकार परिषद झाली आणि त्यात जडेजाबाबत प्रश्न विचारला गेला. द्रविड म्हणाला, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने आशिया चषक स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. आमचे काही प्रमुख खेळाडू मिसिंग आहेत, अन्य संघांचीही तिच परिस्थिती आहे. पण, त्याने आमच्या तयारीत कोणतीच बाधा होत नाहीय.. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ बांधणी करण्याची ही संधी आहे. अन्य खेळाडूंना संधी मिळाली आहे. बुमराह, हर्षल व जडेजा यांच्या पुनरागमनाने संघ आणखी मजबूत होईल. पण, जर तसे न झाल्यास अन्य खेळाडू रिप्लेसमेंट म्हणून तयार केले आहेत.''
विराट कोहलीबाबत...''विराट चांगला खेळतोय.. ब्रेकवरून परतल्यानंतर तो फ्रेश व आनंदी दिसतोय... लोकांना त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत आणि त्यामुळे त्याने नेहमी मोठी खेळी करावी, अशी त्यांची अपेक्षा असते. पण, त्याने केलेली प्रत्येक धाव ही संघासाठी महत्त्वाचीच असते. त्यालाही मोठी खेळी करण्याची भूक आहे आणि ती खेळी झाल्यास आम्हालाही आनंद होईल,''असे द्रविडने सांगितले.
जडेजाच्या दुखापतीबाबत...द्रविड म्हणाला,''रवींद्र जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्याने आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली असून वैद्यकिय तज्ज्ञ त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेऊन आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला अद्याप बराच वेळ आहे. त्यामुळे तो या स्पर्धेतून माघार घेईल की नाही, हे आम्ही आताच सांगू शकत नाही. त्याच्या दुखापतीची आम्हाला काळजी घ्यायची आहे. पुनर्वसनावर बरंच काही अवलंबून आहे.