Asia Cup 2022 IND vs PAK : आशिया चषक स्पर्धेचे आठवे जेतेपद पटकावण्यासाठी टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सज्ज झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया चषक स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. त्यात यंदाच्या स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. विराट कोहलीच्या पुनरागमनाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. विराट, रोहित, लोकेश ही आघाडीची फळी प्लेइंग इलेव्हनमध्ये पक्की आहेच, परंतु पाकिस्तानविरुद्ध कोणाला संधी मिळेल, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. BCCI ने काल सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोतून India vs Pakistan यांच्यातल्या प्लेइंग इलेव्हनची झलक दाखवली आहे. पण, त्यात अष्टपैलू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) हा दिसत नसल्याने तो IND vs PAK सामन्यात खेळणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल यांना दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्यानं चाहते आधीच निराश झाले आहेत. अशात अनुभवी भुवनेश्वर कुमारवर भारतीय गोलंदाजीची धुरा असणार आहे. त्याच्यासोबतीला आवेश खान व अर्षदीप सिंग हे युवा गोलंदाज आहेत. राखीव फळीत असलेल्या दीपक चहरला एन्ट्री का दिली जात नाही, हा प्रश्न सतावतोय. अशात BCCI ने पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनचे संकेत दिले आहेत.
बीसीसीआयने तीन ट्विट्स केले आणि त्यात त्यांनी सलामीपासून ते अखेरच्या गोलंदाजापर्यंतचे १० फोटो पोस्ट केले. त्यात जडेजा कुठेच दिसत नाही.
बीसीसीआयने टीम इंडियाच्या नेट प्रॅक्टीसमधील फोटो पोस्ट केले. त्यात लोकेश राहुल व रोहित शर्मा हे एकत्र दिसत आहेत. तेच ओपनिंग करतील असा अंदाज आहे. त्यानंतर विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या व दिनेश कार्तिक दिसत आहेत. हे क्रमांक ३ ते ७ वर फलंदाजीला येतील. त्यानंतर भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अर्षदीप सिंग व आवेश खान हे गोलंदाजीची धुरा सांभाळतील. भारत-पाकिस्तान यांच्या फॉर्माबाबत बोलायचे झाल्यास ऑक्टोबर २०२१नंतर भारतने २८ पैकी २२ सामने जिंकले आहेत, तर पाचमध्येच पराभव पत्करावा लागला आहे. पाकिस्तानने १२ पैकी १० सामने जिंकले आहेत.
भारत - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंह, आवेश खान.
पाकिस्तान - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.