Asia Cup 2022 Final SL vs PAK : श्रीलंकेने ८ वर्षांनी आशिया चषक जिंकला, पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला!

Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan Live Updates : श्रीलंकेने आशिया चषक २०२२ स्पर्धा जिंकली. स्पर्धेचा पहिलाच सामना गमावल्यानंतर श्रीलंकेने जबरदस्त कमबॅक केले आणि सलग ५ विजय मिळवून जेतेपदाला गवसणी घातली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 11:26 PM2022-09-11T23:26:19+5:302022-09-11T23:28:18+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2022 Final SL vs PAK Live Updates : Sri Lanka defeated Pakistan in the final by 23 runs to lift the Asia Cup 2022 trophy | Asia Cup 2022 Final SL vs PAK : श्रीलंकेने ८ वर्षांनी आशिया चषक जिंकला, पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला!

Asia Cup 2022 Final SL vs PAK : श्रीलंकेने ८ वर्षांनी आशिया चषक जिंकला, पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan Live Updates : श्रीलंकेने आशिया चषक २०२२ स्पर्धा जिंकली. स्पर्धेचा पहिलाच सामना गमावल्यानंतर श्रीलंकेने जबरदस्त कमबॅक केले आणि सलग ५ विजय मिळवून जेतेपदाला गवसणी घातली. ८ वर्षांनंतर श्रीलंकेने आशिया चषक उंचावला. पाकिस्तानला २०१२नंतर आशिया चषक जिंकता आला नाही. वनिंदू हसरंगा ( Wanindu Hasaranga) व भानुका राजपक्षा ( Bhanuka Rajapaksa ) यांनी फलंदाजीत कमाल करताना श्रीलंकेला १७० धावांचा टप्पा गाठून दिला. त्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी कमाल करताना पाकिस्तानला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. हसरंगाने टाकलेले १७वे षटक कलाटणी देणारे ठरले.  

कर्णधार बाबर आजम याचा अपयशाचा पाढा अंतिम सामन्यातही कायम राहिला. मोहम्मद रिझवान व इफ्तिकार अहमद यांनी पाकिस्तानचा डाव सावरताना ५९ चेंडूंत ७१ धावा जोडल्या. ही डोईजड झालेली जोडी तोडण्यासाठी पुन्हा मदुशानला गोलंदाजीला बोलावले गेले आणि त्याने त्याचे काम केले. त्याने टाकलेला संथ चेंडू अहमदने उत्तुंग टोलावला अन् के बंडाराने अप्रतिम झेल घेतला. अहमद ३१ चेंडूंत ३२ धावांवर बाद झाला. पाकिस्तानला विजयासाठी ३० चेंडूंत ७० धावांची गरज असताना चमिका करुणारत्नेने मोठा धक्का दिला. संथ व आखूड चेंडू टाकून त्याने मोहम्मद नवाजला फटका मारण्यास भाग पाडले. मदुशानने सुरेख झेल टिपत नवाजला ६ धावांवर माघारी पाठवले. रिझवानने षटकार खेचून ४७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि संघावरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला. 


चार षटकांत ६१ धावा पाकिस्तानला करायच्या होत्या. वनिंदू हसरंगाने १७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रिझवानची विकेट घेतली. षटकार मारण्याच्या प्रयत्नात रिझवान ( ५५ धावा) गुणतिलकाच्या हाती झेलबाद झाला. एका चेंडूच्या अंतराने हसरंगाने आणखी एक विकेट घेताना आसीफ अलीचा ( ०) त्रिफळा उडवला. त्याच षटकात खुशदील शाह ( २) याला बाद करून पाकिस्तानची अवस्था त्याने ७ बाद ११२ अशी केली. महिष थिक्षानाने ८वा धक्का दिला, तर मदुशानने समन्यातील चौथी विकेट घेतली. मदुशानने ३४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. ६ चेंडूत ३२ धावा करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला. श्रीलंकेने १४७ धावांत पाकिस्तानला गुंडाळून २३ धावांनी विजय मिळवला.

हसरंगा व राजपक्षा यांची वादळी खेळी.... 
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना पाकिस्तानने दमदार सुरुवात केली. कुसल मेंडीस ( ०), पथूम निसंका ( ८), दानुष्का गुणतिलका ( १), कर्णधार दासून शनाका ( २) व धनंजया डी सिल्वा ( २८) हे फलकावर ५८ धावा असताना माघारी परतले.  वनिंदू हसरंगा ( Wanindu Hasaranga) व भानुका राजपक्षा ( Bhanuka Rajapaksa ) यांनी  पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. ३६ चेंडूंत ५८ धावांची ही भागीदारी रौफने संपुष्टात आणली. हसरंगा २१ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३६ धावांवर माघारी परतला. राजपक्षाचा झेल टिपण्याच्या प्रयत्नात शादाब खान व आसीफ अली यांच्यात जोरदार टक्कर झाली. आसीफच्या हातात येणारा सोपा झेल शादाबच्या डाईव्हमुळे सीमापार गेला अन् श्रीलंकेला षटकार मिळाला. शादाबला आजच्या सामन्यात दुसऱ्यांदा दुखापत झाली. राजपक्षाने सातव्या विकेटसाठी चमिका करुणारत्नेसह ३१ चेंडूंत ५४ धावा जोडल्या व संघाला ६ बाद १७० धावांचा टप्पा गाठून दिला. राजपक्षाने ४५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७१ धावा केल्या. 
 

Web Title: Asia Cup 2022 Final SL vs PAK Live Updates : Sri Lanka defeated Pakistan in the final by 23 runs to lift the Asia Cup 2022 trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.