दुबई, आशिया चषक 2018 : भारताच्या विराट कोहलीलाआशिया चषक स्पर्धेत न खेळणे महागात पडू शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) विराटला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेतील भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत विराटचे अव्वल स्थान धोक्यात येऊ शकते. पाकिस्तानचा बाबर आझम त्याच्याकडून हे स्थान हिसकावून घेऊ शकतो.
( Asia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्याने ब्रॉडकास्टर नाराज; BCCI सोबत शीतयुद्ध?)
पाकिस्तानने आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दुबळ्या हाँगकाँगवर आठ विकेट राखून विजय मिळवला. हाँगकाँगने दिलेले ११७ धावांचे आव्हान २ गड्यांच्या मोबदल्यात पाकिस्तानच्या संघाने २३.४ षटकांत १२० धावा करीत सहज पूर्ण केले. इमाम-उल-हकची अर्धशतकी खेळी आणि फखर झामन व बाबर आझम यांच्या उपयुक्त खेळीने पाकिस्तानला विजय मिळवून दिला. बाबरने या सामन्यात सर्वात जलद 2000 धावा करण्याचा विक्रम नावावर केला. त्याने पाकिस्तानच्याच झहीर अब्बास यांच्या 45 डावांत 2000 धावा करण्याचा विक्रमाशी बरोबरी केली आहे. या विक्रमात दक्षिण आफ्रिकेचा हशिम आमला ( 40 डाव) आघाडीवर आहे.
(Asia Cup 2018: उस्मान, इमामच्या खेळीने पाक विजयी; हाँगकाँग पराभूत)
आयसीसी वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत बाबर 825 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. विराट 911 गुणांसह आघाडीवर असला तरी त्याला बाबर पिछाडीवर टाकू शकतो. बुधवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. त्यात बाबर मोठी खेळी साकारून विराटच्या गुणांच्या नजीक जाण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.