दुबई - आशिया चषकाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला आज रविवारी पुन्हा एकदा कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ‘सुपर फोर’ सामना खेळायचा आहे. या सामन्यात आत्मसंतुष्ट न राहता शानदार कामगिरी करण्यावर ‘रोहित अॅन्ड कंपनी’चा भर असेल.
तीन सामन्यात तीन विजयांसह भारताला अंतिम सामन्याकडे कूच करायची आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानवर केवळ तीन चेंडू शिल्लक असताना कसातरी विजय नोंदविणाऱ्या पाकला कामगिरीत सुधारणा करण्याचे आव्हान असेल. तीन दिवसांआधी भारताने पाकला आठ गड्यांनी धुतले तरीही पुन्हा एकदा कुठलीही कसर शिल्लक राखायची नाही, या इराद्यासह भारत खेळण्यास इच्छुक आहे. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत येथील खेळपट्ट्यांवर भारतीय खेळाडू दमदार खेळ करीत आहेत. रोहितने पाक आणि बांग्लादेशविरुद्ध शानदार फटकेबाजी करीत अर्धशतके ठोकली. सहकारी शिखर धवन यानेदेखील इंग्लंडमधील अपयश पुसून काढताना तिन्ही सामन्यांत धावा केल्या. अंबाती
रायुडू आणि दिनेश कार्तिक हेदेखील मधल्या फळीत फॉर्ममध्ये आहेत. महेंद्रसिंह धोनी आणि केदार
जाधव यांनी स्वत:ची उपयुक्तता सिद्ध केली आहे.
वर्षभरानंतर पुनरागमन करणाºया रवींद्र जडेजाने काल चार गडी बाद केले होते. तो तळाच्या स्थानावर धावादेखील काढू शकतो. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव गडी बाद करण्यात आतापर्यंत यशस्वी ठरले आहेत.
पाक संघाला अनुभवी शोएब मलिक याच्याकडून प्रेरणा घ्यावी लागेल. भारत आणि अफगाणिस्तानविरुद्ध मलिकने शानदार फलंदाजी केली. पाकसाठी चिंतेचा विषय ठरला तो मुख्य गोलंदाज मोहम्मद आमिर. त्याला भारताविरुद्ध गडी बाद करण्यात अपयश येताच अफगाणिस्तानविरुद्ध राखीव बाकावर बसविण्यात आले होते. (वृत्तसंस्था)
कामगिरीची पुनरावृत्ती होईल : रोहित शर्मा
बांगलादेशविरुद्ध झालेल्या शानदार कामगिरीचे कौतुक करीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने आज रविवारी पाकविरुद्ध या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा विश्वास व्यक्त केला.
पुनरागमन करणाºया जडेजाने चार गडी बाद केल्यानंतर रोहितने नाबाद ८३ धावा ठोकून शुक्रवारी बांगलादेशला सात गड्यांनी पराभूत केले. सामन्यानंतर रोहित म्हणाला, ‘आम्ही सुरुवातीला भेदक मारा केला. विद्युत प्रकाशझोतात फलंदाजी करणे सोपे जाईल, या इराद्याने धावांचा यशस्वी पाठलागदेखील केला. लहान-लहान स्पेल टाकून गोलंदाजी रोटेट करण्याचे डावपेच होते. हे आव्हानात्मक असले तरी योग्य लाईन आणि लेंथच्या बळावर यश मिळविले. पाकविरुद्ध या कामगिरीची पुनरावृत्ती होईल, असा मला विश्वास आहे.’
स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नाही : रवींद्र जडेजा
दीर्घ काळ बाहेर राहिल्यानंतर असे यशस्वी पुनरागमन होणे माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. स्वत:ला कुणापुढे सिद्ध करण्याची काहीच गरज नाही, असे अष्टपैलू रवींद्र जडेजाचे मत आहे.
डावखुरा गोलंदाज जडेजाने २९ धावांत बांग्लादेशचे चार गडी बाद केले होते. त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. ४८० दिवस बाहेर बसल्यानंतर तो भारतीय संघात परतला आहे. तो म्हणाला, ‘जवळपास सव्वा वर्षानंतर मी संघात परतल्यामुळे हे पुनरागमन अविस्मरणीय आहे. मला कुणापुढे काही सिद्ध करण्याची गरज नाही. माझ्या कौशल्याला आणखी गती देण्याची गरज आहे. पुढील विश्वचषकासाठी संघात स्थान मिळविण्यासाठी ही सुरुवात आहे काय, असे विचारताच तो म्हणाला, ‘विश्वचषकाला अद्याप वर्ष शिल्लक आहे. मी फार पुढचा विचार करीत नाही.’
विश्वचषकाआधी आम्हाला बरेच सामने खेळायचे असल्याने आतापासून कुठलेही भाष्य करणे योग्य नाही. मला संधी मिळेल तेव्हा देशासाठी शानदार कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. सध्या तरी आशिया चषकात चांगली कामगिरी करण्यास मी सज्ज आहे.’
(वृत्तसंस्था)
उभय संघ यातून निवडणार
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी, मनीष पांडे, केदार जाधव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा आणि दीपक चाहर.
पाकिस्तान : फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम, शाह मसूद, सर्फराज अहमद (कर्णधार), शोएब मलिक, हॅरिस सोहेल, शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, हसन अली, जुनेद खान, उस्मान खान, शाहीन आफ्रिदी, आसिफ अली आणि मोहम्मद आमिर.