दुबई : सलामीच्या सामन्यात हाँगकाँगविरुद्ध रडतखडत विजय मिळवल्यानंतर भारतापुढे बुधवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे तगडे आव्हान असेल. विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये फलंदाजांना हाँगकाँगविरुद्ध अपेक्षित कामगिरी करता आली नाही. सलामीवीर शिखर धवनने शतक झळकावले असले, तरी कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी महेंद्रसिंग धोनीचे अपयश भारतासाठी चिंतेची बाब आहे. त्यातच मधली फळी नवख्या हाँगकाँगविरुद्ध अपयशी ठरल्याने भारताच्या चिंतेत आणखी भर पडली. हाँगकाँगने विजय मिळवण्यासाठी भारताला चांगलेच झुंजवले.
त्याचवेळी, पाकिस्तानने सलामीला सहज बाजी मारताना हाँगकाँगला ८ गड्यांनी नमवले. शिवाय पाकने गेल्यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतालाच धक्का देत जेतेपद जिंकले होते. त्यामुळे मानसिकरीत्या पाकिस्तान भारतापेक्षा निश्चित वरचढ असेल.
मात्र असे असले, तरी आतापर्यंतचा या दोन्ही देशांतील सामन्यांचा इतिहास पाहता जो संघ प्रत्यक्ष मैदानात चांगला खेळ करेल तो संघ बाजी मारेल हे नक्की. या हायव्होल्टेज सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले असून या सामन्यासाठी इतिहास कधीही महत्त्वाचा ठरत नाही, हे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळेच भारताला आता सर्व भूतकाळ विसरुन बुधवारी सर्वोत्तम खेळ करुन पाकिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. (वृत्तसंस्था)