गुवाहाटी : आयसीसी वनडे विश्वचषकासाठी अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याला अखेर भारतीय संघात स्थान मिळाले. जखमी अष्टपैलू अक्षर पटेलऐवजी अश्विनची संघात वर्णी लागली. भारताचा संघ पहिला सराव सामना खेळण्यासाठी गुवाहाटी येथे दाखल झाला. या संघासोबत रविचंद्रन अश्विनदेखील दाखल झाल्याने अक्षर पटेल विश्वचषकात दिसणार नाही हे निश्चित झाले.
भारतीय संघ आज गुवाहाटीत गतविजेत्या इंग्लंडसोबत पहिला सराव सामना खेळणार आहे. याआधी, ५ सप्टेंबरला घोषित झालेल्या विश्वचषक संघात रविचंद्रन अश्विनचा समावेश नव्हता. मात्र, अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अश्विनची वर्णी लागली. पाठोपाठ अश्विनला १५ सदस्यांच्या अंतिम संघातही घेण्यात आले. अक्षरला दुखापतीतून सावरण्यास तीन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे.
अक्षर पटेलचा प्रवास...
२०१५ : विश्वचषक संघात निवड पण एकाही सामन्यात संधी मिळाली नाही.
२०१९- विश्वचषक संघात निवड झाली नाही.
२०२३- विश्वचषक संघात निवड झाली, पण दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने संघाबाहेर
रविचंद्रन अश्विनचा प्रवास...
२०११- विश्वचषक संघात निवड
२०१५- विश्वचषक संघात निवड
२०१९- विश्वचषक संघात निवड नाही
२०२३- विश्वचषकाच्या सुरुवातीच्या संघात निवड नाही. अक्षर पटेल दुखापतग्रस्त होताच संघात स्थान.
पाच म्हाताऱ्या अर्कांमध्ये अश्विन
५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे विश्वचषक स्पर्धेतील ५ वयस्कर खेळाडूंमध्ये रविचंद्रन अश्विनची वर्णी लागली आहे. यंदाच्या स्पर्धेत नेदरलँड्सचा विस्ली बॅरेसी हा सर्वांत वयस्कर खेळाडू ठरणार आहे. तो ३९ वर्षे १४९ दिवसांचा आहे. त्यानंतर नेदरलँड्सचाच व्हॅन हेड मर्व ( ३८ वर्षे २७२ दिवस), अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी ( ३८ वर्षे २७१ दिवस), बांगलादेशचा महमुदुल्लाह ( ३७ वर्षे २३७ दिवस) आणि भारताचा रविचंद्रन अश्विन ( ३७ वर्षे १२० दिवस) यांचा क्रमांक लागतो.