R Ashwin Joins Sydney Thunder BBL: भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने अखेर बहुप्रतिक्षित करारावर स्वाक्षरी केली. ऑस्ट्रेलियन टी२० लीग म्हणजेच बिग बॅश लीग स्पर्धेत अश्विन सिडनी थंडर संघाकडून खेळणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले. टीम इंडियाकडून बिग बॅश स्पर्धेत खेळणारा अश्विन हा पहिला खेळाडू ठरणार आहे. भारतीय खेळाडूंनी देशाबाहेरील टी२० लीग स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे नाही असे सांगण्यात आले होते. पण अश्विनने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह IPL मधूनही निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डाने त्याला भारताबाहेरील टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी दिली. आता तो सिडनी थंडर संघाकडून खेळणार आहे.
किती नंबरची जर्सी घालणार?
३९ वर्षीय अश्विन जानेवारीमध्ये ILT20 संपल्यानंतर सिडनी थंडर संघात सामील होईल. तो डेव्हिड वॉर्नर आणि सॅम कॉन्स्टास यांसारख्या ऑस्ट्रेलियन स्टार्ससोबत एकाच संघात खेळताना दिसणार आहे. अश्विनने गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि अलीकडेच आयपीएलमधूनही माघार घेतली. त्यामुळे तो आता जगभरातील इतर टी२० लीगमध्ये नशीब आजमावून पाहणार आहे. बिग बॅशमध्ये अश्विन सिडनी थंडर संघाकडून ९९ क्रमांकाची जर्सी घालून खेळणार आहे. टीम इंडिया आणि IPL मध्ये अश्विन याच क्रमांकाची जर्सी घालून खेळला होता. तोच क्रमांक त्याला नव्या संघातही मिळाला आहे.
पाकिस्तानी खेळाडूसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणार, पण...
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या वर्षी बीबीएलच्या परदेशी खेळाडूंच्या ड्राफ्ट नियमांमध्ये विशेष सूट दिली आहे. बिग बॅश क्लबना त्यांच्या एकूण पैशांच्या पर्सच्या मर्यादेत तीन परदेशी खेळाडूंना साइन करण्याची परवानगी असते. त्यानुसार, सिडनी थंडरने जूनच्या ड्राफ्टमध्ये न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन आणि पाकिस्तानचा अष्टपैलू शादाब खानला संघात घेतले आहे. तर इंग्लंडचा विकेटकीपर सॅम बिलिंग्ज आधीच क्लबसोबत अनेक वर्षांपासून करारबद्ध आहे. अशा परिस्थितीत विशेष सूट देऊन अश्विनला करारबद्ध करण्यात आले आहे. अश्विन पाकिस्तानचा फिरकीपटू शादाब खान याच्यासोबत ड्रेसिंग रुम शेअर करणार आहे. पण सध्या सुरु असलेल्या चर्चांनुसार, अश्विनला संघात शादाब खानच्या जागी खेळवण्यात येणार आहे.