Ashwin Retirement Sachin Tendulkar, Australia Tour: रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीनंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली. तो आता भारतात परतला आहे. पण, निवृत्तीनंतर असे काहीतरी घडले की ज्यामुळे त्याला चक्क हार्ट अटॅक आला असता असे वक्तव्य त्याने केले. अश्विनने स्वत:ची कॉल हिस्ट्री दाखवून हे विधान केले. हा नेमका काय प्रकार आहे, जाणून घेऊया.
कॉल हिस्ट्री पाहून अश्विनला का धक्का बसला?
निवृत्तीनंतरच्या कॉल हिस्ट्रीमध्ये अश्विनला चकित करणारी गोष्ट म्हणजे त्याला दोन बड्या खेळाडूंकडून आलेले कॉल. अश्विनच्या निवृत्तीनंतर त्याच्या वडिलांनी त्याला फोन केलाच. पण त्याव्यतिरिक्त त्याला सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंचे फोन आले. कपिलने अश्विनला व्हॉट्सॲपवर कॉल केला.
अश्विन म्हणाला- मला हार्ट अटॅक आला असता...
निवृत्तीनंतर अश्विन सचिन आणि कपिल यांच्यासह निवृत्त दिग्गज खेळाडूंमध्ये सामील झाला. त्याच्या ट्विटर हँडलवर कॉल हिस्ट्री शेअर करताना अश्विनने लिहिले- जर कोणी मला २५ वर्षांपूर्वी सांगितले असते की माझ्याकडे एक स्मार्टफोन आहे, ज्याचा कॉल लॉग माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी असा दिसणार आहे, तर तेव्हा मला हार्ट अटॅकच आला असता. मला फोन करून शुभेच्छा दिल्याबद्दल सचिन आणि कपिल पाजी यांचे आभार मानू इच्छितो, असे अश्विनने लिहिले.
गाबा कसोटीनंतर निवृत्ती
अश्विनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ७६५ विकेट्स घेतल्या. सध्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अश्विनने फक्त एकच सामना खेळला, ज्यात त्याने १ बळी घेतला. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर अडलेडमध्ये अश्विन प्लेइंग इलेव्हनमध्ये आला पण ब्रिस्बेनमधील पुढच्या कसोटीतून त्याला पुन्हा वगळण्यात आले. अखेर त्याने तिसऱ्या कसोटीनंतर निवृत्ती जाहीर केली.