ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अॅशेस कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिला दिवस हा गोलंदाजांनी गाजवला. मिचेल स्टार्कनं ७ विकेट्सचा डाव साधत पाहुण्या इंग्लंडच्या संघाला १७२ धावांत आटोपले. पण फलंदाजी वेळी ऑस्ट्रेलियन संघाची अवस्था ही इंग्लंडपेक्षा बिकट झाली. बेन स्टोक्सनंही पहिल्या दिवसाच्या खेळातच पाच विकेट्सचा डाव साधत ऑस्ट्रेलियाची अवस्था ९ बाद १२३ अशी केली. पहिल्या दिवसाच्या खेळात १९ विकेट्स पडल्या. दिवसाअखेर ऑस्ट्रेलियन संघ ४९ धावांनी पिछाडीवर राहिला. दुसऱ्या दिवसाच्या खेळात अखेरची विकेट घेऊन पाहुण्या इंग्लंड संघाला पहिल्या डावात अल्प आघाडी घेण्याची संधी आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१४१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं!
पर्थच्या मैदानातील कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मिचेल स्टार्कनं पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर झॅक क्राउलीच्या रुपात इंग्लंडला पहिला धक्का दिला. स्टार्कच्या भेदर माऱ्यासमोर इंग्लंडचा डाव १७२ धावांवर आटोपल्यावर ऑस्ट्रेलियाची सुरुवातही इंग्लंडसारखीच झाली. जोफ्रा आर्चरनं ऑस्ट्रेलियन संघाच्या पहिल्या डावाची सुरुवात करणाऱ्या सलामीवीर जेक वीथरल्ड याला दुसऱ्या चेंडूवर शून्यावर माघारी धाडले. अॅशेस कसोटीच्या १४१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही संघांनी पहिल्या डावात एकही धाव न करता विकेट गमावल्याचे पाहायला मिळाले.
Mitchell Starc World Record : फक्त ६५ चेंडूत ७ विकेट्स! स्टार्कच्या नावे नवा विश्वविक्रम
इंग्लंडकडून फक्त चौघांनी गाठला दुहेरी आकडा; तिघांच्या पदरी भोपळा!
इंग्लंडच्या संघाकडून हॅरी ब्रूकनं ६१ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय ओली पोपनं ५८ चेंडूत ४६ धावा केल्या. या दोघांशिवाय सलामीवीर बेन डकेट २१ (२०) आणि जेमी स्मिथ ३३ (२२) दुहेरी आकडा गाठला. झॅक क्राउली, जो रूट आणि मार्क वूड या तिघांना पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही.
ऑस्ट्रेलियाकडून स्मिथ ट्रॅविस हेडसह सारेच फेल
ऑस्ट्रेलियन संघाकडून सलामीवीर खातेही न उघडता तंबूत परतल्यावर कर्णधार स्टीव्ह स्मिथवर संघाचा डाव सावरण्याची मोठी जबाबदारी होती. पण तो अवघ्या १७ धावांवर ब्रायन कार्स याच्या गोलंदाजीवर बाद झाला. ट्रॅविस हेड ३५ चेंडूचा सामना करून २१ धावावर स्टोक्सच्या जाळ्यात अडकला. कॅरून ग्रीन याने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ५० चेंडूचा सामना करताना २४ धावांची खेळी केली. एलेक्स कॅरीनं २६ चेंडूत केलेली २६ धावांची खेळी ऑस्ट्रेलियाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च खेळी ठरली.