Ashes, ENG vs AUS 2nd Test : ॲशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत रोमहर्षक विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजपासून सुरू झालेल्या लॉर्ड्स कसोटीत यजमान इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जेम्स अँडरसनच्या पहिल्याच षटकात 'हंगामा' झालेला पाहायला मिळाला. दोन आंदोलनकर्ते मैदानावर धावून सामना रोखण्याचा प्रयत्नात दिसले. अचानक दोन आंदोलक मैदानावर आल्याने सर्वच गोंधळले, परंतु यात जॉनी बेअरस्टोने ( Jonny Bairstow ) कमाल केली. त्याने चक्क एका आंदोलकाला उचलेल अन् मैदानाबाहेर जाऊन फेकले.
नेमकं काय घडलं?
दुसऱ्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी स्टुअर्ट ब्रॉड मीडिया सेंटर एंडला उभा होता. अचानक दोन आंदोलक भगवा रंग घेऊन मैदानावर धावले अन् एकाने तो रंग हवेत उडवलाही. बेन स्टोक्स, डेव्हिड वॉर्नर हा प्रकार पाहून हडबडले. याचवेळी बेअरस्टोने एका आंदोलकाला धरले अन् उचलून त्याला मैदानाबाहेर नेले. त्यानंतर ग्राऊंड स्टाफने मैदान साफ केले.
नॅथन लाएचा विक्रम
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लाएन याने आजच्या सामन्यात विक्रमाची नोंद केली. सलग १०० कसोटी सामने खेळणारा तो पहिला फिरकीपटू ठरला. आतापर्यंत एकाही गोलंदाजाला असा पराक्रम करता आला नव्हता. यापूर्वी एलिस्टर कूक ( १५९), एलन बॉर्डर ( १५३), मार्क वॉ ( १०७), सुनील गावस्कर ( १०६) व ब्रेंड मॅक्युलम ( १०१) यांनी असा पराक्रम केला होता.
ॲशेस मालिकेतील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने २ विकेट्स राखून जिंकली. २८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना उस्मान ख्वाजा ( ६५) आणि कर्णधार पॅट कमिन्स ( ४४*) यांची खेळी महत्त्वाची ठरली. चौथ्या दिवशीच
इंग्लंडने ३ विकेट्स मिळवल्या होत्या अन् पाचव्या दिवशी पावसामुळे एक सत्र वाया गेले अन् त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी कागारूंना धक्के दिले. ७१ धावांची गरज असताना भरवशाचा उस्मान बाद झाला पण, कमिन्स अखेरपर्यंत खेळपट्टीवर उभा राहिला. त्याने ऑस्ट्रेलियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.