Ashes, AUS vs ENG 2nd Test : यजमान ऑस्ट्रेलियानं अॅशेस कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडसमोर विजयासाठी ४६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील  ९ बाद ४७३ ( डाव घोषित) धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २३६ धावांवर गडगडला. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं दुसरा डाव ९ बाद २३० धावांवर घोषित केला. पण, सध्या चर्चा रंगतेय ती स्टीव्ह स्मिथ ( Steve smith) याच्या मध्यरात्रीतील त्या व्हीडिओची.  
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियानं १ बाद ४५ धावा करून २९० धावांची आघाडी घेतली होती. या आघाडीनंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना सुखद झोप लागली असेल. पण, कर्णधार स्टीव्ह स्मिथ  मध्यरात्री उठून हॉटेलच्या रुममध्ये शॅडो बॅटींग करताना दिसला. स्मिथची पत्नी डॅनी विलिस हिनं इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला. स्मिथ त्याच्या नव्या बॅटीची चाचपणी करत होता. स्मिथच्या पत्नीनं पोस्ट केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  
पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत स्मिथकडे ऑसी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आलं. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात ९ बाद ४७३ धावा उभ्या केल्या. मार्नस लाबुशेन ( १०३), डेव्हिड वॉर्नर ( ९५), स्टीव्ह स्मिथ ( ९३) व अॅलेक्स केरी ( ५१) यांनी दमदार फलंदाजी केली. इंग्लंडच्या बेन स्टोक्सनं तीन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला पहिल्या डावात २३६ धावा करता आल्या. डेवीड मलान ( ८६), कर्णधार जो रूट (  ६२) यांनी संघर्ष केला. मिचेल स्टार्कनं ४ आणि नॅथन लियॉननं तीन विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियानं दुसरा डाव ९ बाद २३० धावांवर घोषित केला. लाबुशेन (  ५१) व ट्रॅव्हिस हेड ( ५१) यांनी दमदार कामगिरी केली.