Join us

Ashes 2019 : स्टीव्हन स्मिथनं इंग्लंडला रडवले, विक्रमात कॅप्टन कोहलीलाही मागे टाकले 

Ashes 2019 : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेला गुरुवारपासून सुरूवात झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 12:11 IST

Open in App

बर्मिंगहॅम, अ‍ॅशेस 2019 : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेला गुरुवारपासून सुरूवात झाली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवातही याच सामन्यातून झाल्यानं सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. पहिल्याच दिवशी नाट्यमय खेळ झाला. स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्स यांच्या भेदक माऱ्यासमोर शरणागती पत्करलेल्या ऑस्ट्रेलियाला स्टीव्हन स्मिथनं पुन्हा ताठ मानेनं उभं केलं. स्मिथनं या डावात शतकी खेळी करून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा विश्वविक्रम मोडला. स्मिथनं आपल्या अप्रतिम खेळानं इंग्लंडला रडवलेच नाही, तर कोहलीलाही मागे टाकले. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाचे 8 फलंदाज 122 धावांत तंबूत परतले होते. मात्र, स्टीव्हन स्मिथनं एका बाजूनं खिंड लढवली, त्यानं अनुभवी गोलंदाज पीटर सिडलसह नवव्या विकेटसाठी 88, तर नॅथन लियॉनसह दहाव्या विकेटसाठी 74 धावांची भागिदारी करून इंग्लंडच्या गोलंदाजांच्या डोळ्यात पाणी आणलं. 8 बाद 122 वरून ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 284 धावा केल्या. चेंडू कुरतडल्याप्रकरणी शिक्षा पूर्ण करणारे स्मिथ, डेव्हीड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट हे तिघेही प्रथमच कसोटी संघात एकत्र खेळले. इंग्लंडच्या चाहत्यांनी या तिघांना सँडपेपर दाखवून डिवचलेही. पण, स्मिथने या सर्वांना चोख प्रत्युत्तर दिले. वॉर्नर आणि बँक्रॉफ्ट ही सलामीची जोडी अवघ्या 17 धावांत माघारी पाठवून ब्रॉडनं इंग्लंडला मोठं यश मिळवून दिले. त्यानंतर वोक्सने मधल्या फळीतील फलंदाज उस्मान ख्वाजा आणि ट्रॅव्हीस हेड यांनाही बाद केले. मॅथ्यू वेड, टीम पेन, जेम्स पॅटीन्सन, पॅट कमिन्स यांना दुहेरी आकडाही पार करता आला नाही. पण, स्मिथ एका बाजूनं खिंड लढवत होता. त्यानं 219 चेंडूंत 16 चौकार व 2 षटकारांसह 144 धावा केल्या. सिडलनेही 85 चेंडूंत 44 धावा केल्या. स्मिथचे हे कसोटी क्रिकेटमधील 24वे शतक ठरलं. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 24 शतकं करणारा तो दुसरा फलंदाज बनला. त्यानं या विक्रमात कोहलीला मागे टाकले.

स्मिथनं 118 डावांत हा पल्ला गाठला. या विक्रमात सर डॉन ब्रॅडमन ( 66 डाव) अव्वल स्थानावर आहेत. कोहलीला हा पल्ला गाठण्यासाठी 123 डाव खेळावे लागले. महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( 125 डाव) चौत्या स्थानावर आहे. त्यानंतर ग्रेग चॅपेल, व्हीव्ह रिचर्ड्स आणि मोहम्मद युसूफ यांचा क्रमांक येतो.   

टॅग्स :अॅशेस मालिकास्टीव्हन स्मिथआॅस्ट्रेलियाइंग्लंडविराट कोहली