Join us  

Ashes 2019: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्टीव्हन स्मिथची तिसऱ्या कसोटीतून माघार

तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 3:38 PM

Open in App

हेडिंग्ले, अ‍ॅशेस 2019 : तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. अ‍ॅशेस कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात जायबंदी झालेला स्टीव्हन स्मिथ पूर्णपणे तंदुरुस्त नाही. त्यामुळे 22 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या हेडिंग्ले कसोटीतून त्याला माघार घ्यावी लागली आहे. स्मिथने पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावांत शतकी खेळी केली होती, तर दुसऱ्या कसोटीतही त्यानं 92 धावा चोपल्या होत्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. स्मिथ खेळणार नसल्याने यजमान इंग्लंडला आता विजयाचे स्वप्न नक्की पडू लागले असतील.

अ‍ॅशेस कसोटी मालिकेच्या दुसऱ्या कसोटीत पदार्पण करणाऱ्या इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने स्मिथला जायबंद केले. जोफ्रानं टाकलेला बाऊंसरवर स्मिथला दुखापत झाली आणि त्याला कसोटीतून माघार घ्यावी लागली. शिवाय स्मिथच्या तिसऱ्या कसोटीतही खेळण्याची शक्यताही फार कमी असल्याचे बोलले जात होते. आर्चरने 148.7 ताशी प्रति कि.मी. या वेगाने बाऊंस टाकला. हा बाऊंसर स्मिथच्या मानेला लागला. हा चेंडू एवढ्या जोरात स्मिथला लागला की, त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात तो फलंदाजीला आलाच नाही. तरीही स्मिथ तिसऱ्या कसोटीसाठी तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा होती, परंतु मंगळवारी ऑसी प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी स्मिथ खेळणार नसल्याचे जाहीर केले. 

पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत मिळून 286 धावा करणाऱ्या स्मिथला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. दुसऱ्या कसोटीत त्यानं 92 धावा केल्या. या कसोटी सामन्यानंतर स्मिथने आयसीसी क्रमवारीत 913 गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली. अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीपूर्वी स्मिथ 857 गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता आणि विलियम्सन 913 गुणांसह दुसऱ्या... पण, श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात विलियम्सनला दोन्ही डावांत अपयश आले. त्यामुळे सोमवारी जाहीर झालेल्या क्रमवारीत त्याची 887 गुणांसह तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. भारताचा कॅप्टन विराट कोहली 922 गुणांसह अव्वल स्थानावर आहे, परंतु स्मिथ आणि त्याच्यातील गुणांचे अंतर हे केवळ 9 गुणांचे राहिले आहे. त्यामुळे कोहलीच्या अव्वल स्थानाला स्मिथकडून धोका निर्माण झाला आहे.   

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधीस्टीव्हन स्मिथला बॉल लागल्यावर आता ऑस्ट्रेलिया घेणार मोठा निर्णय 

टॅग्स :अ‍ॅशेस 2019स्टीव्हन स्मिथआॅस्ट्रेलियाइंग्लंड