Join us

Ashes 2019 : मिचेल मार्शचे झोकात पुनरागमन, इंग्लंडचा पहिला डाव तीनशेच्या आत गुंडाळला

अ‍ॅशेस 2019 : मिचेल मार्शने कसोटी संघात पुनरागमन करताना इंग्लंडच्या संघाला हादरे दिले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 16:11 IST

Open in App

अ‍ॅशेस 2019 : मिचेल मार्शने कसोटी संघात पुनरागमन करताना इंग्लंडच्या संघाला हादरे दिले. अ‍ॅशेस मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मार्शने यजमान इंग्लंडचा निम्मा संघ माघारी पाठवला. त्याला अन्य गोलंदाजांनी योग्य साथ दिल्याने कांगारुंनी इंग्लंडचा पहिला डाव 294 धावातच गुंडाळला. कर्णधार जो रूट ( 57) आणि जोस बटलर ( 70) यांच्या अर्धशतकी खेळीमुळे इंग्लंडने तीनशे धावांपर्यंत मजल मारली. मार्शने कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या दिवशी इंग्लंडला केवळ 23 धावांची भर घालता आली. इंग्लंडचा संघ मालिकेत 1-2 अशा पिछाडीवर आहे आणि अखेरच्या कसोटीत विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडवण्याच्या त्यांचा निर्धार आहे. पण, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्यांच्या निर्धाराला सुरूंग लावला. रोरी बर्न्स आणि जो डेन्ली यांना पहिल्या विकेटसाठी 27 धावाच जोडता आल्या. तरीही या अ‍ॅशेस मालिकेतील दोन्ही संघांकडून सलामीवीरांनी केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. डेन्ली माघारी परतल्यानंतर बर्न्स आणि कर्णधार रूट यांनी संघाचा डाव सावरला. पण, 47 धावांवर जोस हेझलवूडनं बर्न्सला माघारी पाठवले. रूटनं या सामन्यात 57 धावा करून कसोटी क्रिकेटमध्ये 7000 धावांचा पल्ला ओलांडला. हा पल्ला पार करणारा तो तिसरा सर्वात युवा फलंदाज ठरला. रूटला अन्य फलंदाजांकडून साजेशी साथ मिळाली नाही. बटलरने तळाच्या फलंदाजांना सोबत घेत संघाची धावसंख्या वाढवली, परंतु सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सहाव्या षटकात इंग्लंडचे दोन फलंदाज माघारी परतले आणि त्यांना 294 धावांवर समाधान मानावे लागले. बटरलने 70 धावा केल्या. मिचेल मार्शने 46 धावांत 5 विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्स ( 3/84) आणि जोस हेझलवूड ( 2/76) यांनी त्याला उत्तम साथ दिली. 

टॅग्स :अ‍ॅशेस 2019आॅस्ट्रेलियाइंग्लंड